वीकेंड, कर्मचाऱ्यांचा नियोजित संप आणि बकरी-ईदची सुट्टी

जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते असेल आणि तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील, तर ती आजच पूर्ण करून घ्या. देशातील सर्वात मोठी बँक असलेली 'एसबीआय' येत्या २३ मे पासून सलग ६ दिवस बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वीकेंड, कर्मचाऱ्यांचा नियोजित संप आणि बकरी-ईदची सुट्टी यामुळे हा बँकिंगमधील मोठा खंड पडणार आहे.
नेमके कारण काय?
बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन' या देशातील सर्वात मोठ्या कर्मचारी संघटनेने २५ आणि २६ मे (सोमवार आणि मंगळवार) रोजी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. बँक प्रशासनासोबत झालेल्या अनेक चर्चांनंतरही कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहिल्याने संघटनेने हे पाऊल उचलले आहे. या संपामध्ये नवीन भरती प्रक्रिया, 'नॅशनल पेन्शन सिस्टम' फंड मॅनेजर्सची निवड, बँक कामांचे वाढते आऊटसोर्सिंग (बाह्यस्रोतीकरण), करिअर प्रोग्रेशन स्कीममधील विसंगती आणि एचआरएमएस संबंधित प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे.
असे आहे सुट्ट्यांचे गणित:
२३ मे: महिन्याचा चौथा शनिवार (बँक सुट्टी)
२४ मे: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२५ व २६ मे: एसबीआय कर्मचारी संघटनांचा नियोजित संप
२७ व २८ मे: बकरी-ईद निमित्त आरबीआयची सुट्टी (काही राज्यांत २७ तर काही ठिकाणी २८ मे रोजी सुट्टी असेल)
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
या सलग सुट्ट्यांमुळे बँकेच्या शाखांमधील प्रत्यक्ष कामकाज पूर्णपणे ठप्प होऊ शकते. रोकड जमा करणे, चेक क्लिअरन्स, पासबुक अपडेट, कर्जाशी संबंधित कामे आणि प्रत्यक्ष ग्राहक सेवा यावर याचा मोठा परिणाम होईल. प्रत्यक्ष बँक शाखेत जाऊन करावी लागणारी कामे २३ मे पूर्वीच पूर्ण करून घ्यावीत, जेणेकरून सुट्ट्यांच्या काळात होणारी गैरसोय आणि विनाविलंब कामे टाळता येतील.