आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर बस-टँकरमध्ये भीषण धडक

अपघातात दोघांचा मृत्यू, २४ जखमी

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
5 hours ago
आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर बस-टँकरमध्ये भीषण धडक

फिरोजाबाद : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर शुक्रवार पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. कानपूरहून गुरुग्रामकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या डबल डेकर स्लीपर बसने समोरील टँकरला  पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसताच बसने पेट घेतला आणि काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत बसचा चालक आणि वाहक या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर २४ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.



अपघातानंतर बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि घटनास्थळी किंकाळ्या व रडण्याचा आवाज घुमू लागला. पोलीस आणि अग्निशामक दल पोहचण्यापूर्वीच स्थानिक नागरिक आणि महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत बचावकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर बसला लागलेली आग आटोक्यात आणली. जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने फिरोजाबाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातामुळे आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनांचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा