'कॉकरोच जनता पार्टी'चे ट्विटरवर जोरदार कमबॅक

मुख्य अकाऊंटवर बंदी आल्यानंतर 'कॉकरोच इज बॅक' अकाऊंटला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
'कॉकरोच जनता पार्टी'चे ट्विटरवर जोरदार कमबॅक

भारतात सध्या सोशल मीडियापासून ते थेट राजकीय वर्तुळापर्यंत एकाच  नावाची चर्चा आहे ते म्हणजे 'कॉकरोच जनता पार्टी.' नुकतीच या पक्षाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर भारतात बंदी घालण्यात आल्यानंतर या डिजिटल चळवळीची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. मुख्य खात्यावर निर्बंध आल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी तातडीने 'कॉकरोच इज बॅक' या नावाने नवीन अकाऊंट सुरू केले, याला पहिल्याच दिवशी १ लाख ३१ हजारपेक्षा अधिक लोकांनी फॉलो केले. अवघ्या ७-८ दिवसांत लाखो तरुणांना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या या चळवळीकडे आता केवळ एक सोशल मीडिया ट्रेंड म्हणून न पाहता, देशातील तरुण पिढीच्या वाढत्या असंतोषाचा डिजिटल चेहरा म्हणून पाहिले जात आहे.



या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी

 भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवक आणि झुरळ यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानाशी जोडलेली आहे. त्यांच्या या विधानानंतर देशभरातील तरुणांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जरी नंतर सरन्यायाधीशांनी आपल्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले असले, तरी तोपर्यंत सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. याच परिस्थितीचा वेध घेत मूळचे छत्रपती संभाजीनगरचे असणारे आणि सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे पदव्युत्तर शिक्षण घेणारे अभिजित दिपके यांनी एक्सवर एक उपहासात्मक पोस्ट केली. जर देशातील सर्व कॉकरोच एकत्र आले तर काय होईल? या त्यांच्या एका प्रश्नाने देशातील 'जेन झी' म्हणजेच आजच्या तरुण पिढीच्या भावनांना थेट हात घातला आणि तिथूनच या आगळ्यावेगळ्या डिजिटल पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली.



कॉक्रोच पार्टीच्या सदस्यांसाठी नियमावली


अभिजित दिपके यांनी या मोहिमेला अधिक संघटित करण्यासाठी एक वेबसाईट, इन्स्टाग्राम हँडल आणि एक्स खाते तयार केले. या कल्पनेला तरुणांनी इतका प्रचंड प्रतिसाद दिला की, अवघ्या तीन दिवसांत इन्स्टाग्रामवर ४० लाख फॉलोअर्सचा टप्पा पार झाला, तर वेबसाईटवर दोन लाखांहून अधिक मुलांनी सदस्यत्वासाठी नोंदणी केली. मात्र, या वाढत्या लोकप्रियतेमुळे पक्षाचे मूळ एक्स अकाऊंट भारतात बॅन करण्यात आले. यावर तीव्र आक्षेप घेत अभिजित यांनी म्हटले की, सुरुवातीला अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर त्यावर बंदी घालण्यात आली. आम्ही केवळ शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारी यावर यंत्रणेला प्रश्न विचारत असताना आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


A parody 'cockroach' party in India becomes major outlet for youth anger  and protest | king5.com


या आंदोलनाचे गांभीर्य आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या ट्रेंडला देशातील तरुणांच्या तीव्र नाराजीचे जिवंत लक्षण मानले आहे, तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींनीही या पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही याकडे केवळ एक विनोद म्हणून न पाहता, भारतातील तरुणांच्या अस्वस्थतेचे डिजिटल सादरीकरण म्हणून याचे विश्लेषण सुरू केले आहे.


Who Is Abhijeet Dipke? Meet The Cockroach Janta Party Founder | KRH News


अनेकांना हा केवळ सरन्यायाधीशांविरोधातील तात्पुरता राग वाटत असला, तरी अभिजित दिपके यांनी हे स्पष्ट केले आहे की, हा कोणत्याही एका व्यक्तीवरचा राग नसून संपूर्ण प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा संताप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांमध्ये चांगल्या शिक्षणाचा अभाव, वाढती बेरोजगारी आणि ढासळत्या सामाजिक मूल्यांमुळे निराशा साचली होती. या निराश तरुण पिढीला 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रूपाने हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. नवीन पिढीला जात-पात किंवा धार्मिक भेदभावाचे राजकारण नको, त्यांना रोजगार आणि तंत्रज्ञानाधारित प्रगती हवी आहे, हेच या चळवळीतून सिद्ध होत आहे.


Cockroach Janta Party: இந்திய இணையத்தளங்களை அதிரவைக்கும் 'காக்ரோச் ஜனதா  கட்சி' (Cockroach Janta Party)! ஒரு வைரல் மீம் புரட்சியின் பின்னணி!


सध्याच्या काळात या आंदोलनाची तुलना शेजारील देशांमधील हिंसक युवा आंदोलनांशी केली जात असली, तरी अभिजित यांनी ही तुलना पूर्णपणे नाकारली आहे. भारतातील तरुण पिढी सुजाण असून त्यांचा लोकशाही आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे हा तरुण आपली नाराजी शांततेच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच व्यक्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियावरून सुरू झालेली ही चळवळ आता देशातील एका मोठ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करत असून, ती आगामी काळात काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा