१२०० वर्षे जुनी 'अमर ज्योत' सुरक्षित

पश्चिम जपानमधील हिरोशिमा प्रांतातील प्रसिद्ध मियाजिमा बेटावर असलेल्या 'माउंट मिसेन' पर्वतावरील एका ऐतिहासिक बौद्ध मंदिराला भीषण आग लागली. या आगीत प्रसिद्ध 'दैशोइन' (Daisho-in) मंदिर समूहाचा भाग असलेले ऐतिहासिक 'रेकाडो हॉल' (Reikado Hall) पूर्णपणे जळून खाक झाले आहे. लाकडी बांधकाम असलेल्या या प्राचीन वास्तूचे आगीत प्रचंड नुकसान झाले असून, या घटनेने जपानमधील ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
The Reikado Hall of Daishoin Temple in western Japan housing what is believed to be a 1,200-year-old “eternal flame” was destroyed in a fire in Hiroshima prefecture.
— Radar Africa (@radarafricacom) May 21, 2026
The sacred flame, originally lit by a Buddhist monk in the year 806, was later used to ignite the eternal flame… pic.twitter.com/e7gCJ8WeoZ
बुधवारी लागलेली ही आग काही वेळातच संपूर्ण परिसरात आणि जवळील झाडांमध्ये पसरली. स्थानिक अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीत संपूर्ण वास्तू जळून कोळसा झाली असली, तरी मंदिरातील पवित्र आणि ऐतिहासिक 'अमर ज्योत' सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वीच या ज्योतीला मुख्य रचनेपासून वेगळे करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. बौद्ध भिक्षू 'कुकाई' (कोबो दाईशी) यांनी इसवी सन ८०६ मध्ये माउंट मिसेनवर तपश्चर्या करताना ही ज्योत पेटवली होती, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
या अमर ज्योतीला जपानमध्ये अत्यंत पवित्र आणि राष्ट्रीय महत्त्वाचे स्थान आहे. याच ज्योतीचा एक भाग हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कमधील 'शांततेची ज्योत' पेटवण्यासाठी वापरण्यात आला होता. त्यामुळे या ज्योतीचे नाते दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शांतता आणि स्मृती मोहिमेशी जोडलेले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी २००५ मध्येही हे मंदिर आगीत नष्ट झाले होते आणि २००६ मध्ये त्याची पुनर्बांधणी करण्यात आली होती. लाकडी वास्तूंचा ऐतिहासिक वारसा जपणे आणि त्यांचे आगीपासून रक्षण करणे, या दुहेरी आव्हानाचा विचार करण्याची वेळ या दुर्घटनेमुळे जपान प्रशासनावर आली आहे. सध्या अधिकारी आगीच्या अचूक कारणाचा शोध घेत आहेत.