फरार बस चालक फर्मागुडी येथे ताब्यात

पणजी: गोव्यातील मोले-कासावली (Mollem-Kasavali) येथे एका भरधाव व्हॉल्वो बसने पुढील पर्यटकांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तामिळनाडूतील एका गरोदर महिलेसह एकूण पाच जण जखमी झाले.
अपघातग्रस्त वाहनाचे चालक निजाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील होसूर येथून त्यांचे कुटुंब पर्यटनासाठी गोव्यात आले होते. उत्तर गोव्यात जात असताना एका मोठ्या व्हॉल्वो बसने त्यांच्या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पर्यटकांच्या वाहनाने रस्त्यावरच दोन पलटी मारली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.ही घटना काल गुरुवारी घडली.
गर्भवती महिलेसह लहान मुले थोडक्यात बचावली
अपघात झाला त्या वेळी कारमध्ये ३ महिला, २ पुरुष आणि ३ लहान मुले प्रवास करत होती. अपघातात एका ३ महिन्यांच्या गर्भवती महिलेला गंभीर दुखापत झाली आहे, तर एका पुरुषाच्या पायाला आणि इतर प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. सुदैवाने वाहनातील तिन्ही लहान मुले या अपघातात सुरक्षित आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फरार बस चालक फर्मागुडी येथे ताब्यात
अपघात झाल्यानंतर व्हॉल्वो बस चालकाने अपघातस्थळी न थांबता बससह तेथून पळ काढला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून फरार बसचा शोध घेतला आणि अखेर बस चालकाला फर्मागुडी येथे ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.