चार जणांना अटक; दुबईस्थित क्रमांकावरून पीडितेला धमकीचे फोन

नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया नगर परिसरातील बटला हाऊस येथे एका २३ वर्षीय दलित तरुणीचे सामूहिक अपहरण करून सामूहिक बलात्कार (23 year Dalit Woman gang-raped in Delhi), अमानुष छळ आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी दक्षिण-पूर्व दिल्ली पोलिसांनी (South-East Delhi Police) गुन्हा दाखल करून चार संशयितांना अटक केली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये सोशल मीडियाद्वारे ‘साहिल’ या नावाने ओळख दाखवणाऱ्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. नंतर त्याचे खरे नाव फहीम असल्याचे तिला समजले. संशतियाने स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम हिंदू कुटुंबातील असल्याचे सांगत विवाहाचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, २०२२ मध्ये तिला बटला हाऊस परिसरात बोलावण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्याद्वारे ब्लॅकमेल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तिला मेरठ येथे नेऊन पुन्हा लैंगिक अत्याचार करण्यात आले.
संशयित फहीम, नातेवाईक बेकायदेशीर शस्त्र व्यवहारात
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, संशयित फहीम आणि त्याचे नातेवाईक बेकायदेशीर शस्त्र व्यवहारात सहभागी असल्याचे तिला नंतर समजले. “मला घाबरवण्यासाठी अंगावर रक्त टाकले जात होते आणि प्राण्यांचे मांस फेकले जात होते,” असा धक्कादायक दावा पीडितेने केला आहे.
तसेच, ‘तसलीम मौलवी’ नावाच्या व्यक्तीनेही आपला छळ केल्याचा आरोप तरुणीने केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बटला हाऊस परिसरात सामूहिक बलात्कार झाल्याच्या आरोपावरून जामिया नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
दुबईस्थित क्रमांकावरून पीडितेला धमकीचे फोन
दरम्यान, फहीमला २०२५ मध्ये गुरुग्राम पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ असलेला मोबाईल जप्त करण्यात आल्याने; संबंधित सामग्री लीक होणार नाही, असा विश्वास तिला वाटू लागला होता. मात्र, नंतर फहीमने मंडोली कारागृहातून संपर्क साधल्याचा आणि दुबईस्थित क्रमांकावरून धमकीचे फोन आल्याचाही आरोप तिने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.