म्हापशात असुरक्षित इमारतींचा धोका; ४९ इमारती असुरक्षित

उपजिल्हाधिकार्‍यांकडून संयुक्त पाहणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
म्हापशात असुरक्षित इमारतींचा धोका; ४९ इमारती असुरक्षित

म्हापसा : येथील शहरात एकूण ४९ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या असुरक्षित इमारतींमध्ये ४२ खासगी तर ७ शासकीय इमारतींचा समावेश आहे. पावसाळा  असल्याच्या पार्श्वभूमीवर बार्देशच्या उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा शहरातील असुरक्षित व धोकादायक इमारतींची पुनर्तपासणी संयुक्त मोहीम राबवण्यात आली.

गुरूवारी २१ रोजी राबवलेल्या या मोहिमेवेळी  म्हापसा नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी (District Collector of North Goa)  दिलेल्या आदेशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली. पावसाळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत असलेल्या इमारतींमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही विशेष सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली होती.  

यावेळी या पथकाने असुरक्षित व धोकादायक म्हणून घोषित केलेल्या शासकीय तसेच खाजगी इमारतींना प्रत्यक्ष भेट दिली आणि त्यांच्या सद्यस्थितीचा तसेच संरचनात्मक स्थिरतेचा आढावा घेतला.

धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसा 

 म्हापसा पालिकेने शहरात सुमारे ४२ खासगी धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची ओळख पटवली आहे. सध्या वापरात किंवा लोक वास्तव्यास असलेल्या धोकादायक इमारतींच्या मालकांना जागा रिकामी करण्याची पुन्हा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर इमारतींच्या मालकांना आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाने ७ धोकादायक सरकारी इमारती शोधल्या आहेत. यात प्रामुख्याने जुन्या निवासी क्वार्टर्सचा समावेश आहे.

पुन्हा तपासणी मोहीम राबवली : उपजिल्हाधिकारी

म्हापशातील असुरक्षित म्हणून चिन्हांकित करण्यात आलेल्या इमारतींच्या संरचनात्मक स्थिरतेची तपासणी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि कारवाईच्या उद्देशाने आम्ही पुन्हा तपासणी मोहीम राबवली आहे. म्हापसा नगरपालिकेने निश्चित केलेल्या खाजगी इमारतींचा तसेच साबांखाच्या इमारत विभागाने चिन्हांकित केलेल्या शासकीय इमारतींचा या तपासणीत समावेश असल्याची माहिती बार्देशच्या उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी दिली. 


हेही वाचा