उद्योग क्षेत्राने हस्तकला उत्पादनांना प्राधान्य द्यावे : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
23 mins ago
उद्योग क्षेत्राने हस्तकला उत्पादनांना प्राधान्य द्यावे : मुख्यमंत्री

पणजी : गोव्यातील (Goa) सामान्य नागरिकांसह खाजगी कंपन्या, उद्योग क्षेत्राने हस्तकला उत्पादने (Handicraft Products) विकत घेण्यास प्राधान्य द्यावे. ही उत्पादने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशी उत्पादने विकत घेतल्यास स्थानिक कारागिरांचा फायदा होईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले.

कला अकादमी येथे ‘ट्रायबल क्राफ्ट’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री रमेश तवडकर, बाबू कवळेकर, खात्याचे संचालक सगुण वेळीप व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने कुणबी साडी, शाल यांच्यासह अन्य हस्तकला उत्पादनांना प्राधान्य दिले आहे.राज्यात कोणीही सरकारी पाहुणे आल्यास त्यांना कुणबी साडी, शाल भेट म्हणून दिली जाते. यामुळे आता कुणबी कला देशभर पोहोचली आहे.

स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी आम्ही गरजूंना कौशल्य प्रशिक्षण देत आहोत. ग्रामीण भागातील उद्योजकांना चालना मिळावी यासाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानिक हस्तकला टिकून राहावी यासाठी आता खाजगी क्षेत्राने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, राज्य सरकार हस्तकला कारागिरांना प्राधान्य देत आहे. कारागिरांना प्रशिक्षण देणे, आधुनिक उपकरणे देणे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत २०० हून अधिक विणकाम यंत्रे देण्यात आली आहेत. तर ३०० प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

आतापर्यंत सरकारने २ हजारहून अधिक हस्तकला कारागिरांना मदत केली आहे. याशिवाय बहुजन समाजातील महिला स्वयंसहाय्यता गटांना देखील आर्थिक मदत करण्यात आली आहे.

हेही वाचा