पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग; पेट्रोल प्रति लिटर ८७ पैशे तर डिझेल ९१ पैशांनी महाग

१० दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग; पेट्रोल प्रति लिटर ८७ पैशे तर डिझेल ९१ पैशांनी महाग

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel)  दरात शनिवारी पुन्हा वाढ  करण्यात आली.  गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी दरवाढ ठरली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची, तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे इंधन दरांवर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीमध्ये (Delhi) पेट्रोलचा दर ९८.६४ रुपयांवरून ९९.५१ रुपये प्रति लिटर झाला आहे.  डिझेलचा दर ९१.५८ रुपयांवरून ९२.४९ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास ८५ टक्के तेल आयातीवर अवलंबून असल्याने जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होत आहे.

या नव्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, वाहतूकदार तसेच विविध उद्योग क्षेत्रांवरील खर्चाचा भार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मालवाहतूक खर्च वाढल्यास महागाईवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा 

दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे. तसेच काही पेट्रोल पंपांवरील तात्पुरता ताण नियंत्रणात आणण्यासाठी तेल कंपन्यांकडून सतत पुरवठा आणि वितरणाचे नियोजन सुरू असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

हेही वाचा