सोशल मीडिया खात्यांवर कारवाई सुरूच असल्याचा आरोप

देशातील तरुण पिढीमध्ये अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपले वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. पक्षाच्या अधिकृत 'एक्स' (ट्विटर) हँडलवर भारतात बंदी घातल्यानंतर आता इन्स्टाग्राम अकाउंट्सना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या घटनेमुळे डिजिटल राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अभिजीत दिपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वैयक्तिक अकाउंटसह पक्षाचे बॅकअप इन्स्टाग्राम अकाउंटही काही काळासाठी बंद करण्यात आले होते; मात्र काही तासांनंतर ते पूर्ववत झाले. मेटाच्या रिकव्हरी प्रक्रियेद्वारे अकाउंट सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला असता, 'सुरक्षेच्या कारणास्तव अकाउंट लॉक करण्यात आले आहे,' असा संदेश वारंवार येत असल्याचे स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केले आहेत. "सध्या आमचे आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाही. त्यामुळे या काळात होणाऱ्या कोणत्याही पोस्टला अधिकृत समजू नये," असे स्पष्टीकरण दिपके यांनी 'एक्स'वरून दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कॉक्रोच जनता पार्टीचे मूळ 'एक्स' खाते भारतात ब्लॉक करण्यात आले होते. मात्र, या कारवाईनंतर पक्षाने 'कॉक्रोच इज बॅक' या नव्या नावाने पुन्हा एन्ट्री केली. "तुम्हाला वाटले की तुम्ही आमच्यापासून सुटका करून घ्याल? पण तसे नाही," अशा आशयाचे मीम्स शेअर करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

केवळ उपरोधिक आणि मीम चळवळ म्हणून सुरू झालेल्या या मोहिमेने सोशल मीडियावर इतिहास घडवला आहे. अवघ्या काही दिवसांतच या पक्षाने इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत भाजप आणि काँग्रेससारख्या १४१ वर्षे जुन्या राष्ट्रीय पक्षांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

बोस्टनमध्ये राहणारे आणि २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'साठी सोशल मीडियाचे काम करणारे अभिजीत दिपके या पक्षाचे संस्थापक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुण आणि आंदोलकांची तुलना कथितपणे 'झुरळांशी' केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. सरन्यायाधीशांनी नंतर यावर स्पष्टीकरण दिले असले, तरी तोपर्यंत तरुणांमधील संताप वाढला होता. त्यातूनच या 'कॉक्रोच जनता पार्टी'चा जन्म झाला.
सोशल मीडियावरील निर्बंधांनंतरही 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या फॉलोअर्समध्ये सातत्याने वाढ होत असून, हा पक्ष भारताच्या डिजिटल राजकीय चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. ही चळवळ भविष्यात अधिकृत राजकीय पक्षात रूपांतरित होणार की केवळ इंटरनेटपुरती मर्यादित राहणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.