राज्यांनी आव्हानांचे रूपांतर संधींमध्ये करावे : ओम बिर्ला

राष्ट्रकुल संसदीय संघाच्या परिषदेचे उद्घाटन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
50 mins ago
राज्यांनी आव्हानांचे रूपांतर संधींमध्ये करावे : ओम बिर्ला

पणजी : राज्यांनी त्यांच्यासमोर असणाऱ्या आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये करावे असे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla)  यांनी केले. गुरुवारी पणजीत राष्ट्रकुल संसदीय भारत क्षेत्र, विभाग सातच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग, सभापती गणेश गावकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल शिंदे व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

ओम बिर्ला (Speaker of the Lok Sabha)  म्हणाले की, पश्चिम विभागातील गोवा (Goa), गुजरात (Gujrat)  आणि महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) राज्यांच्या एका बाजूला समुद्र असल्याने विकासावर काही मर्यादा येत होत्या.

मात्र मागील काही वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नामुळे सागरी किनारपट्टी असणारी राज्ये आपल्या भौगोलिक संकटांवर मात करत विकासकामे करत आहेत. तिन्ही राज्ये पर्यटन, व्यापार, सागरी दळणवळण, बंदर उभारणी आदींच्या माध्यमातून आपली प्रगती करत आहेत. अन्य राज्यांनी देखील याचे अनुकरण केले पाहिजे. 

ते म्हणाले, आपल्या राज्यात कोणत्या समस्या आहेत कोणती आव्हाने आहेत याचा विचार करावा. त्या सोडवण्यासाठी कायदे, नियम, ध्येय धोरणे बनवली गेली पाहिजेत. असे करताना लोकांची भागधारकांची मते लक्षात घ्यावीत. लोकशाहीमध्ये लोकसंवाद, चर्चा या मार्गांचा वापर करून सामूहिक निर्णय घेणे महत्त्वाचे असते.

योग्य ते कायदे बनवल्यास संकटांवर मात करून विकास करणे शक्य आहे. आवश्यकता असेल तर यामध्ये एआय किंवा अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. विकास करताना अंत्योदय समाज कल्याण या तत्त्वांचा विचार करणे देखील गरजेचे आहे. 

आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी दूरदर्शी रोड मॅप बनवावा

आपल्या मतदार संघाचा विकास करणे ही लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारी असते. आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी दूरदर्शी रोड मॅप बनवला पाहिजे. मतदार संघात आदर्श विकास कामे करून दाखवावीत. लोकप्रतिनिधींकडून विकास कामांसह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, लोकांना स्वावलंबी बनवणे हे देखील अपेक्षित आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या अधिक आहे. अशावेळी जास्तीत जास्त युवकांनी संसद, विधानसभेत यावे यासाठी आपण प्रयत्न करावेत; असे ओम बिर्ला यांनी सांगितले. 

तरुण लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, विकसित भारत २०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुण लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची आहे. गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांनी एकत्रित येऊन शाश्वत विकास कामे केली पाहिजेत. या राज्यांनी एकमेकांच्या चांगल्या गोष्टी स्वीकारून आपला विकास केला पाहिजे. गोवा सरकारने विविध सेवा ऑनलाईन करून जनतेचा फायदा केला आहे. व्यवसाय सुलभता केल्याने राज्यातील गुंतवणूक वाढत आहे.








हेही वाचा