विनापरवाना, अस्वच्छ वातावरणात खाद्यनिर्मिती करणारे घोगळ, रावणफोंडमधील युनिट्स बंद

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ८५ हजारांचा माल जप्त

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
4 hours ago
विनापरवाना, अस्वच्छ वातावरणात खाद्यनिर्मिती करणारे घोगळ, रावणफोंडमधील युनिट्स बंद

मडगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने मडगावातील घोगळ आणि रावणफोंड परिसरातील खाद्यपदार्थ निर्मिती युनिट्सची पाहणी केली. विनापरवाना आणि अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत सुरू असलेली ही युनिट्स पथकाने तत्काळ बंद केली आहेत. या कारवाईत ८५ हजार रुपये किमतीचे सुमारे ४५० किलो फरसाण जप्त करण्यात आले आहे.


राज्यातील जनतेला सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने सासष्टी तालुक्यातील घोगळ आणि रावणफोंड भागात ही विशेष तपासणी मोहीम राबवली. प्राप्त तक्रारींच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.




तपासणी दरम्यान, अनेक वर्षांपासून विनापरवाना आणि अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या एका युनिटला तत्काळ काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित युनिटच्या मालकावर १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच हुबळी येथून आणलेला आणि लेबल नसलेला फरसाण व इतर पदार्थांचा साठा जप्त केला. दुसऱ्या एका युनिटमध्ये १८ हजार रुपये किमतीचा मुदत संपलेला (Expired) साठा आढळल्याने त्यावरही कारवाई करण्यात आली.



या मोहिमेत एकूण ८५ हजार रुपये किमतीचे ४५० किलो फरसाण जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना परवानगी असलेले खाद्यरंग, स्वच्छतेचे निकष आणि 'रुको' (RUCO) उपक्रमांतर्गत वापरलेल्या खाद्यतेलाची विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शन केले. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध विभागाने दिला आहे.

कृत्रिम रंगांचा वापर

तपासणी मोहिमेत एका युनिटमध्ये खाद्यपदार्थांमध्ये धोकादायक कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याचे समोर आले. या युनिटला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, परिसरातील त्रुटी सुधारेपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




हेही वाचा