इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुखांचा पुतण्या ठार; मध्यपूर्वेत तणाव कायम

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26 mins ago
इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुखांचा पुतण्या ठार; मध्यपूर्वेत तणाव कायम

बेरूत : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली (Israel) लष्कराने लेबनॉनची राजधानी (Lebanon)  बेरूत (Beirut) येथे केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नईम कासिम यांचा पुतण्या अली युसुफ हर्शी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) गुरुवारी याबाबत अधिकृत निवेदन जारी केले.

लष्कराच्या माहितीनुसार, अली युसुफ हर्शी नईम कास‌िम यांचा वैयक्तिक सचिव आणि जवळचा सल्लागार होता. तो कास‌िम याच्या कार्यालयाच्या व्यवस्थापन आणि सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होता. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून, हिजबुल्लाहसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इस्रायलच्या सलग हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घडामोडींवर लक्ष केंद्रीत झाले आहे.

इराणची शांतता चर्चेसाठी पावले 

याच पार्श्वभूमीवर, इराणने शांतता चर्चेसाठी पावले उचलली असून, इराणी प्रतिनिधी मंडळ इस्लामाबाद येथे महत्त्वाच्या चर्चेसाठी दाखल होणार असल्याची माहिती राजदूत रझा अमिरी मोग्हदम यांनी दिली आहे. त्यांनी प्रस्तावित १० मुद्द्यांवर गंभीर चर्चा होणार असल्याचेही स्पष्ट केले.

कच्च्या तेलाच्या किंमतीत १४ टक्क्यांनी घसरण 

दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाल्यानंतर जागतिक बाजारात सकारात्मक हालचाली दिसून आल्या. जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे १४ टक्क्यांची घसरण झाली असून, ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय (WTI)  क्रूडच्या किंमती १०० डॉलरच्या खाली व्यवहार करत आहेत.

एकीकडे युद्धविरामाची आशा निर्माण होत असली तरी, हल्ल्यांच्या घटनांमुळे मध्यपूर्वेतील तणाव अजूनही पूर्णपणे शमलेला नाही. परिस्थितीवर जगाचे लक्ष कायम आहे.

हेही वाचा