युद्धविराम कराराचा भंग केल्यास इराणचा सर्वनाश अटळ : ट्रम्पचा इशारा

लेबनॉनमध्ये शोकदिवस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
युद्धविराम कराराचा भंग केल्यास इराणचा सर्वनाश अटळ : ट्रम्पचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला दिलेल्या कराराचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. युद्धविराम कराराचा भंग केल्यास इराणचा सर्वनाश अटळ असल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिआ आहे.  

सोशल मीडियावर त्यांनी स्पष्ट केले की, “खरा युद्धविराम करार पूर्णपणे अंमलात येईपर्यंत” अमेरिकेची सर्व जहाजे, विमाने आणि लष्करी दल इराणच्या आसपास तैनात राहतील. अन्यथा संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

लेबनॉनमध्ये २५४ जणांचा मृत्यू, देशव्यापी शोकदिवस

दरम्यान, इस्रायली हल्ल्यांच्या मालिकेमुळे लेबनॉनमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. बुधवारी झालेल्या हल्ल्यांत किमान २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. १,१६५ हून अधिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लेबनॉनने देशव्यापी शोकदिवस जाहीर केला आहे.

लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम (Nawaf Salam) यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व राजकीय व राजनैतिक साधने वापरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu)  यांनी स्पष्ट केले की, अमेरिका-इराण युद्धविराम करारात लेबनॉनचा समावेश नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्से यांनीही “असा कोणताही वादा केला नव्हता” असे सांगत ही भूमिका अधोरेखित केली.

दोन्ही एकत्र शक्य नाही : इराण 

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची (Abbas Araghchi)  यांनी मात्र अमेरिकेसमोर स्पष्ट पर्याय ठेवला आहे. “युद्धविराम किंवा इस्रायलमार्फत सुरू राहणारे युद्ध, दोन्ही एकत्र शक्य नाहीत.”

आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन 

या भीषण परिस्थितीत लेबनॉनचे आरोग्यमंत्री रकान एन.  यांनी आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले असून, मोठ्या प्रमाणातील जखमी नागरिकांवर उपचार करताना आरोग्य व्यवस्था ताणाखाली आली आहे. दरम्यान, गाझामध्ये पत्रकार मोहम्मद विशाह यांच्या करण्यात आलेल्या हत्येचा तीव्र निषेध करत “हे घृणास्पद अपराध” असल्याचे म्हटले जात आहे.एकूणच, मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून युद्धविरामाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे.

हेही वाचा