नाशिकमध्ये आयटी कंपनीत 'सेक्स स्कँडल' आणि धर्मांतरण; सहा टीम लिडर्सना अटक

गेल्या चार वर्षांपासून सुरू होता कर्मचाऱ्यांचा छळ; हलगर्जीपणा दाखवणाऱ्या एचआर हेडवरही गुन्हा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
नाशिकमध्ये आयटी कंपनीत 'सेक्स स्कँडल' आणि धर्मांतरण; सहा टीम लिडर्सना अटक

नाशिक : महाराष्ट्र राज्याची औद्योगिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, बलात्कार आणि कर्मचाऱ्यांचे सक्तीने धर्मांतर करण्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाने नाशिकसह संपूर्ण राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सहा टीम लीडर्सना अटक केली असून, कंपनीच्या एचआर प्रमुखावरही गुन्हा दाखल केला आहे. गेल्या चार वर्षांपासून या कंपनीच्या बंद दाराआड हा विकृत प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. खरात प्रकरणाने आधीच हादरलेल्या नाशिकमध्ये ही घटना उघडकीस आल्याने सामान्य जनतेमध्ये संताप पसरला आहे. 

नाशिकमधील या आयटी कंपनीत सुमारे ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सहाही आरोपी हे कंपनीत टीम लीडर या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. या पदाचा गैरवापर करून त्यांनी अनेक महिला सहकाऱ्यांचे लैंगिक शोषण केले. एका आरोपीवर बलात्काराचा गंभीर आरोप आहे, तर इतरांवर विनयभंग आणि कामाच्या ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ लैंगिक शोषणच नाही तर या ठिकाणी धार्मिक कट्टरतावादाचाही शिरकाव झाल्याचे उघड झाले आहे. तैसिफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख आणि रजा मेमन या आरोपींनी एका हिंदू कर्मचाऱ्याला सक्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याला दुपारी कामाच्या वेळेत नमाज पठण करण्याची सक्ती केली जात होती, तसेच त्याला बळजबरीने प्रतिबंधित मांस (बीफ) खाऊ घातल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित युवकाच्या धर्मांतरानंतरचे फोटो समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनाचा आणि एचआर विभागाचा उदासीन दृष्टिकोन. पीडित महिलांनी 'पॉश' (Prevention of Sexual Harassment - POSH) नियमांनुसार एचआर हेडकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. एका पीडितेने जेव्हा आपल्यावर होणाऱ्या लैंगिक छळाची माहिती दिली, तेव्हा एचआर हेडने "मोठ्या कंपन्यांमध्ये (MNCs) हे सर्व सामान्य आहे, शांत राहा," असे उत्तर देऊन तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. या गुन्हेगारी स्वरूपाच्या दुर्लक्षामुळे पोलिसांनी आता एचआर प्रमुखालाही आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

नाशिक पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण ९ गुन्हे (FIR) दाखल केले असून, त्यापैकी ८ तक्रारी महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आहेत. पीडितांची संख्या मोठी असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आरोपींनी आपल्या अधिकारांचा वापर करून महिलांना धमकावणे आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे सत्र गेल्या चार वर्षांपासून चालवले होते. एसआयटीचे पथक आता धर्मांतर आणि लैंगिक छळ या दोन्ही बाजूंचा समांतर तपास करत आहे. या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.


हेही वाचा