आचिर्णेच्या जंगलात शिकारीसाठी आलेल्या तरुणांवर अज्ञातांचा गोळीबार; एकजण जागीच ठार

हल्लेखोर अद्यापही फरार, वैभववाडी पोलिसांचे तपासाचे चक्र वेगात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
49 mins ago
आचिर्णेच्या जंगलात शिकारीसाठी आलेल्या तरुणांवर अज्ञातांचा गोळीबार; एकजण जागीच ठार

वैभववाडी: सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे गाव. चहुबाजूंनी पसरलेले घनदाट जंगल, कुर्ली धरणाचा संथ वाहणारा कालवा आणि रात्रीची ती भयाण शांतता. मंगळवारची ती रात्र नेहमीसारखीच होती, पण आचिर्णे घाणेगडवाडीतील सागर पोटळे आणि कृष्णा कातकर या दोन मित्रांसाठी ती काळरात्र ठरेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी घराबाहेर पडलेला ३१ वर्षीय सागर पोटळे आज आपल्या कुटुंबात परतलाच नाही. आचिर्णेच्या त्या काळोख्या जंगलात नेमकं काय घडलं, याचा सस्पेन्स आता अधिकच गडद झाला आहे.


घटनेची पार्श्वभूमी अशी की, आचिर्णे येथील नेताजी व्हटकर यांच्या ऊस शेतीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला होता. या वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी सागर आणि कृष्णा हे दोघे मित्र मंगळवारी रात्री १० च्या सुमारास कुर्ली कालव्याजवळ दबा धरून बसले होते. शिकार समोर येईल, अशी त्यांना अपेक्षा होती. दरम्यान कालव्याच्या बाजूने असलेल्या कच्च्या रस्त्यावरून अचानक एक दुचाकी आली. त्या दुचाकीवर दोघे स्वार होते आणि त्यांच्या हातात बंदूक होती. काही कळण्यापूर्वीच त्या दोन अज्ञातांनी बंदुकीचा बार काढला. शांत जंगलात बंदुकीचा आवाज घुमला.

बंदुकीतून सुटलेली गोळी कृष्णा कातकर याच्या उजव्या खांद्याला घासून गेली, मात्र दुसरी गोळी थेट सागर पोटळे याच्या छातीत घुसली. गोळी लागताच सागर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. अंधाराचा फायदा घेत दुचाकीस्वारांनी पळ काढला. रक्ताने माखलेला कृष्णा विव्हळत असताना त्याने कसाबसा आपला मित्र विनायक सुतार याला फोन लावला. काही वेळातच विनायक, युवराज रावले आणि सुधीर डोंगरे कार घेऊन घटनास्थळी धावले. जखमींना वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली. तरेळेमार्गे कणकवलीच्या दिशेने गाडी सुसाट धावत होती. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी सागरला तपासून मृत घोषित केले.

या घटनेमुळे संपूर्ण वैभववाडी तालुका हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर आपल्या ताफ्यासह जंगलात दाखल झाले. पोलिसांनी रात्रीच्या अंधारातच पंचनामा केला. पण खरी गुंतागुंत इथूनच सुरू होते. गोळीबार करणारे ते दोन इसम कोण होते? त्यांचा हेतू केवळ शिकार करणे होता की या दोघांनाच लक्ष्य करणे? ४८ तास उलटूनही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांनी गावातील काही संशयित तरुणांची चौकशी सुरू केली आहे, मात्र अद्याप कोणताच ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ही घटना अपघाती गोळीबाराची आहे की पूर्ववैमनस्यातून रचलेला हा कट आहे, या प्रश्नांच्या भोवऱ्यात पोलीस तपास अडकला आहे. आचिर्णेच्या त्या घनदाट झाडीत दडलेला हा 'सस्पेन्स' कधी उलगडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या कृष्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याचा जबाब या प्रकरणाचे गूढ उकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. 

हेही वाचा