नाशिकमध्ये एका आयटी कंपनीत लैंगिक छळ, बलात्काराचे प्रकरण उघडकीस

सहा जणांन अटक : प्रकरणाची व्याप्ती मोठी; तपासासाठी एसआयटी स्थापन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
35 mins ago
नाशिकमध्ये एका आयटी कंपनीत लैंगिक छळ, बलात्काराचे प्रकरण उघडकीस

नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra)  नाशिक (Nashik)  येथे एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या गंभीर लैंगिक छळ प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कंपनीतील सहा टीम लीडर्सना (Team Leaders)  लैंगिक छळ (Sexual harrasement), विनयभंग, बलात्कार (Rape) तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

पोल‌िसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण नऊ गुन्हे (FIR) नोंदवण्यात आले आहेत. त्यात आठ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. संशयितांमध्ये आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसीफ अत्तार यांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातील कंपनीच्या एचआर (HR ) प्रतिनिधी असलेल्या एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे.

दोन ते तीन वर्षांपासून प्रकार सुरू

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे प्रकार सुरू असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. १८ ते २५ वयोगटातील महिलांना कामाच्या ठिकाणी अयोग्य स्पर्श, अश्लील टिप्पणी, कपड्यांवरून टीका तसेच धार्मिक आधारावर अपमानास्पद वक्तव्ये सहन करावी लागल्याचे समोर आले आहे. एका प्रकरणात आरोपीने खोट्या नात्याचे आमिष दाखवून पीडितेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे.

या प्रकरणातील एकमेव पुरुष पीडितालाही धार्मिक शिवीगाळ करण्यात आली तसेच जबरदस्तीने गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, एका महिला पीडितेच्या वागणुकीत मोठा बदल झाल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. ती पूर्वी पाश्चात्य कपडे परिधान करत असताना नंतर तिने पारंपरिक पोशाख स्वीकारला. चेहरा झाकू लागली आणि रोजा पाळू लागली. या बदलांमुळे संशय निर्माण झाल्यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.

प्रकरण दडपल्याचा आरोप 

पीडितांनी यापूर्वी पॉश (POSH) कायद्यांतर्गत (कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंधन व निवारण कायदा २०१३) तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्या दडपल्याचा आरोप एचआर अधिकाऱ्यावर असून, त्याच कारणावरून तिलाही अटक करण्यात आली आहे.

पीडितांनी तक्रार करण्यास पुढे यावे : एसआयटी 

प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आणि आणखी पीडित समोर येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू असून, संबंधित माहिती असलेल्या नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे

हेही वाचा