
लेबनॉन : इराणने होर्मुझ सामुद्रधुनी सशर्त खुली करण्याची तयारी दाखवल्याने अमेरिकेने दोन आठवड्यांसाठी युद्ध स्थगित करण्याची घोषणा केली आहे. इराणनेही याला मान्यता दिली आहे. मात्र, इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच ठेवल्याने; पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील टायर (Tyre) शहरावर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी इराणविरोधातील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यासाठी इराणने (Iran) होर्मुझ सामुद्रधुनी ( Strait of Hormuz) मार्ग पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे खुला करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इराणने या अटी मान्य करीत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला सहमती दर्शवली आहे. तसेच या कालावधीत सामुद्रधुनीतून होणाऱ्या समुद्री वाहतुकीस सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची हमीही दिली आहे.
युद्धविरामाचे उल्लंघन झाल्यास कठोर प्रत्युत्तर : इराण
तथापि, इराणने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की हा युद्धविराम म्हणजे संघर्ष समाप्ती नाही. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने (Supreme National Security Council of Iran) इशारा दिला आहे की, युद्धविरामाचे उल्लंघन झाल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. “आमचे हात ट्रिगरवरच आहेत; शत्रूकडून कोणतीही चूक झाल्यास पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल,” असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
तात्पुरता युद्धविराम तरी तणाव कायम
एकीकडे लेबनॉनमध्ये सुरू असलेले हल्ले आणि दुसरीकडे इराण-अमेरिका युद्धविरामाचा तात्पुरता करार; दोन्ही घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अजूनही अत्यंत तणावपूर्ण असल्याचे स्पष्ट होत आहे.