
नवी दिल्ली (New Delhi) : अमेरिके-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील ३४ प्रमुख विमानतळांवर देशांतर्गत (domestic flights) उड्डाणांसाठी लँडिंग आणि पार्किंग शुल्कात २५ टक्क्यांची कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सवलत पुढील तीन महिन्यांसाठी लागू राहणार आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (AERA) याबाबत आदेश जारी केला. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली असून; दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबादसह देशातील प्रमुख विमानतळांवर ही कपात लागू होणार आहे.
अमेरिके-इराण ( US-Iran war) तणावामुळे विमान इंधन (ATF) दरात झालेली वाढ आणि त्याचा विमान कंपन्यांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच सरकारने देशांतर्गत एटीएफ (ATF) दरवाढ २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमानभाडे वाढू नये यासाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. बहुतांश विमानतळ पीपीपी (PPP) मॉडेलवर चालवले जात असतानाही सरकारने शुल्कात हस्तक्षेप करत हा निर्णय घेतल्याचे विशेष मानले जात आहे.
या निर्णयामुळे विमान कंपन्यांना आर्थिक दिलासा मिळण्यासोबतच प्रवाशांनाही विमानप्रवास अधिक परवडणारा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.