महिला पोलीस गेल्या आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात

नाशिक: शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत (Multinational IT Company) महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अत्यंत धाडसी आणि गुप्त ‘स्पेशल ऑपरेशन’ (Special Operation) राबवत महिला अधिकाऱ्यांना आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात कंपनीत पाठवले. आणि एका मोठ्या प्रकरणाची भांडाफोड झाली. लैंगिक शोषणाचे (Nashik sexual assault) उघडकीस आलेले नाशिक मधील हे तिसरे प्रकरण आहे.
पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करत असल्याचा संशय होता. याची खातरजमा करण्यासाठी महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सात जणींच्या पथकाने कंपनीत वेशांतर करून प्रवेश केला. कंपनीत काम करत असल्याचा भास निर्माण करून या पथकाने संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले.
गैरवर्तन पोलिसांनी प्रत्यक्ष पाहिले
तपासादरम्यान मीटिंगच्या वेळी होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी प्रत्यक्ष पाहिले. तसेच, कंपनीतील सुमारे ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज (CCTV Camera footage) तपासून ठोस पुरावे गोळा करण्यात आले. पुरावे हाती लागताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांना अटक केली.
धर्मांतराचा दबाव आणि अत्याचाराचे गंभीर आरोप
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष्य केले जात होते. “तुला नोकरी माझ्यामुळे मिळाली” असे सांगत महिलांवर उपकाराचे ओझे टाकून त्यांचे मानसिक शोषण केले जात होते. एका पीडितेच्या तक्रारीनुसार, तिला सुट्टीच्या दिवशी रिसॉर्टवर (Resort) नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
याशिवाय, एका पुरुष कर्मचाऱ्यालाही धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे समोर आले आहे. कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप आहे.
अटक केलेल्या पाच जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाण्यात आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेश, रझा मेमन, तौसिफ अत्तार या पाच मुख्य संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
अशोक खरातनंतर नाशिकमध्ये तिसरे मोठे प्रकरण
अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणांनंतर नाशिकमधील हे तिसरे मोठे प्रकरण मानले जात आहे. उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्येही महिला सुरक्षित नसल्याची चिंताजनक बाब या घटनेतून समोर आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि किती महिला बळी पडल्या आहेत, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.