पुण्यात प्रियकरासाठी पोटच्या गोळ्याची हत्या; निर्दयी मातेला अटक

बाथरूममध्ये चिमुरड्याचा गळा दाबून केला खून; मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा बनाव फसला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th April, 12:19 pm
पुण्यात प्रियकरासाठी पोटच्या गोळ्याची हत्या; निर्दयी मातेला अटक

पुणे : आईच्या प्रेमाला जगात कशाचीही उपमा देता येत नाही, मात्र पुण्यातून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने 'माता न तू वैरिणी' या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. आपल्या अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या अवघ्या सहा वर्षांच्या मुलाचा स्वतःच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी बसरीन मेहबूब शेख (वय २७) हिला अटक केली असून, तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड हा सध्या फरार आहे. आवेज मेहबूब शेख असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरुळी परिसरात राहणारी बसरीन आणि तिचा प्रियकर राम यांच्यात प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये सहा वर्षांचा आवेज अडथळा ठरत असल्याने या दोघांनी त्याचा काटा काढण्याचा अमानुष कट रचला. आरोपींनी निष्पाप आवेजला बाथरूममध्ये नेऊन गळा दाबून त्याची जीवनयात्रा संपवली.

हत्येचा हा गुन्हा लपवण्यासाठी संशयितांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आवेजचा मृतदेह त्यांनी एका 'इर्टिका' कारमध्ये घातला आणि थेट बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गाठले. तिथे मुलाचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्याचा बनाव रचून अंत्यसंस्कार करण्याची त्यांची तयारी होती. मात्र, नातेवाईक इसाक शेख यांना मुलाच्या आकस्मिक निधनाबद्दल संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी बसरीनला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.

सध्या बसरीन पोलिसांच्या कोठडीत असून, फरार प्रियकर राम कजेवाड याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. एका निष्पाप जिवाचा अशा प्रकारे बळी घेतल्यामुळे कुरुळी परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे गोळा करून अधिक तपास करत असून, संशयितांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनसामान्यातून केली जात आहे.


हेही वाचा