
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई ( Mojtaba Khamenei ) यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात ‘नव्या टप्प्याची’ सुरूवात करण्याचे संकेत दिले आहेत. इराणला युद्ध नको असले तरी आपल्या सार्वभौम हक्कांवर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इराण (Iran) आणि अमेरिका (United States) यांच्यात नुकताच जाहीर झालेला दोन आठवड्यांचा नाजूक युद्धविराम सध्या टिकून असला, तरी त्यावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. या युद्धविरामामुळे संभाव्य शांतता चर्चेला दार उघडले असले, तरी प्रदेशातील तणाव अजूनही शिगेला पोहोचलाआहे.
सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित संदेशात खामेनेई म्हणाले, “आम्ही युद्धाची इच्छा बाळगत नाही; मात्र आमचे हक्क सोडणार नाही. प्रतिकार करणारे सर्व गट आम्ही एकसंध मानतो.” त्यांनी इराणी जनतेलाही आवाहन करत, “युद्धविराम झाला असला तरी रस्त्यावरचा आवाज थांबवू नका; जनतेचा दबाव चर्चांवर परिणाम करतो,” असे सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कठोर इशाऱ्यानंतरच हा तात्पुरता युद्धविराम शक्य झाल्याचे मानले जात आहे. मात्र इस्त्रायल ( Israel) आणि लेबनॉन (Lebanon) यांच्यातील संघर्षामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.
लेबनॉनमध्ये हल्ल्यात ३००हून अधिक मृत्यू
लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याने तणाव वाढला आहे. इराण समर्थित हिझबुल्ल्हा ( Hezbollah) वर हल्ले सुरू राहिल्यास “कठोर प्रत्युत्तर” दिले जाईल, असा इशारा तेहरानकडून देण्यात आला आहे.
लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही : नेतान्याहू
या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी लेबनॉनबाबत कोणताही युद्धविराम नसल्याचे स्पष्ट करत, लष्करी कारवाया सुरूच राहतील असे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये इस्रायल-लेबनॉन चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खामेनेई सावरत आहेत
दरम्यान, खामेनेई सार्वजनिकरीत्या दिसत नसल्याने त्यांच्या आरोग्याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, ते जखमांमधून सावरत असून सध्या निवेदनांद्वारेच नेतृत्व करत आहेत.