लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हवाई हल्ले; २५४ ठार, १,१०० हून अधिक जखमी

इराणचा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय; तर युद्धविरामातून माघार घेणार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
29 mins ago
लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हवाई हल्ले; २५४ ठार, १,१०० हून अधिक जखमी

लेबनॉन : लेबनॉनमध्ये (Lebanon) इस्रायली (Israel)  सैन्याच्या भीषण हवाई हल्ल्यांमुळे मोठी जीवितहानी झाली असून; किमान २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,१०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अवघ्या १० मिनिटांच्या कालावधीत १०० हून अधिक हवाई हल्ले करण्यात आल्याने राजधानी बेरूतसह (Beirut) संपूर्ण देश हादरून गेला आहे.

अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने या हल्ल्यांच्या निषेधार्थ होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती अधिक चिघळल्यास युद्धविरामातून माघार घेण्याचा इशाराही इराणकडून देण्यात आला आहे.

रुग्णालयांवर ताण वाढला असून, मोठ्या प्रमाणावर जखमींना उपचार देण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा झगडत आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके अजूनही प्रयत्न करत आहेत.

युद्ध सुरू झाल्यानंतर सर्वात मोठी कारवाई 

ही हल्ल्यांची मालिका लेबनॉनमधील युद्ध सुरू झाल्यानंतरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump)  यांनी १५ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले सुरू झाले. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी लेबनॉन हा या युद्धविरामाचा भाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हल्ल्यांमध्ये सैदा येथील एका कॅफेवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले. बालबेक येथे अंत्यसंस्कारावर हल्ला झाल्याने किमान १० जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

अनेक हल्ले गर्दीच्या निवासी भागांवर केंद्रीत असल्याने मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) या कारवाईत ५० लढाऊ विमानांचा सहभाग असल्याचे सांगितले आहे. हिझबुल्लाच्या ठिकाणांवर लक्ष्य साधण्यात आल्याचा दावा केला आहे.

इराणचा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय

दरम्यान, इराणने या हल्ल्यांच्या निषेधार्थ होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती अधिक चिघळल्यास युद्धविरामातून माघार घेण्याचा इशाराही इराणकडून देण्यात आला आहे.

लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ (Joseph Aoun)  यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत त्यांना “अमानुष आणि क्रूर कृत्य” असे संबोधले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही केली आहे.

मध्यपूर्वेतील तणाव वाढला 

या भीषण हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा