पर्यटकांच्या दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंमुळे व्यवसायावर संकट; दक्षिण गोवा टॅक्सी संघटना आक्रमक

वास्को: गोव्यातील पर्यटन व्यवसायाचा कणा असलेल्या टॅक्सीचालकांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधान केल्याप्रकरणी दक्षिण गोवा टॅक्सी संघटनेने आता कायदेशीर लढा पुकारला आहे. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर रुपाली दीक्षित यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये गोव्यातील टॅक्सीचालकांना थेट 'माफिया' असे संबोधल्याने टॅक्सी व्यवसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संघटनेने वास्को पोलीस स्थानकात रुपाली दीक्षित यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली असून कडक कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण एका प्रवासाच्या भाड्यावरून सुरू झाले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी रुपाली दीक्षित यांनी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मालवण (महाराष्ट्र) असा प्रवास एका टॅक्सीने केला होता. या प्रवासासाठी त्यांनी ५,५०० रुपये भाडे अदा केले होते. विशेष म्हणजे, हे भाडे त्यांनी प्रवासाच्या अंती समाधानकारकपणे दिले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी गोव्यातील टॅक्सीचालक प्रवाशांकडून अवाजवी पैसे उकळतात आणि त्यांची वागणूक गुन्हेगारी स्वरूपाच्या 'माफिया'सारखी आहे, असा खळबळजनक आरोप केला.
दक्षिण गोवा टॅक्सी संघटनेने हे सर्व आरोप पुराव्यानिशी फेटाळून लावले आहेत. संघटनेच्या मते, विमानतळ ते मालवण हे अंतर आणि रात्रीची वेळ विचारात घेता आकारलेले ५,५०० रुपये भाडे हे सरकारी अधिसूचनेतील दरांपेक्षाही कमी आहे. असे असतानाही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा 'व्ह्यूज' वाढवण्यासाठी अशा प्रकारचे दिशाभूल करणारे व्हिडिओ बनवून गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला तडा दिला जात आहे. अनेक टॅक्सीचालक हे पिढ्यानपिढ्या हा पारंपरिक व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत. अशा बेजबाबदार विधानांमुळे त्यांच्या उपजीविकेवर गदा येत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी होत आहे.
गोव्यातील टॅक्सी व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. पर्यटकांना सेवा देताना अनेकदा स्थानिक चालक प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. एखादी वैयक्तिक तक्रार असल्यास ती रितसर पोलीस किंवा वाहतूक विभागाकडे मांडण्याऐवजी, संपूर्ण समूहाला गुन्हेगारी विशेषणे लावणे हे अत्यंत चुकीचे आहे, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन संबंधित इन्फ्लुएन्सरवर तातडीने कारवाई करावी आणि अशा प्रकारच्या द्वेषयुक्त कंटेंटवर आळा घालावा, अशी आग्रही मागणी आता होत आहे. पर्यटकांनी आणि सोशल मीडियावरीलइन्फ्लुएन्सर्सनी तथ्य तपासूनच आपली मते मांडावीत, जेणेकरून कोणाच्याही सन्मानाला धक्का लागणार नाही, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहे.