भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमताने घेतला निर्णय

पणजी : फोंडा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Ponda Assembly By-election) रद्द होणे हा गोव्यातील (Goa) इतिहासतला काळा दिवस आहे. पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा (Congress) विजय होणार असल्याचे दिसून येताच भाजप (BJP) आणि निवडणूक आयोगाने (Election Commission) संगनमताने हा निर्णय घेतला. निवडणूक आयोग हा भाजप सरकारचा पपेट झाला आहे; असा आरोप प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमीत पाटकर यांनी केला.
फोंडा पोटनिवडणुकीसाठी उद्या ९ एप्रिलला मतदान होणार होते. मतदानाच्या आदल्यादिवशी निवडणूक रद्द करण्याचा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिला. कायदेशीर प्रक्रियेसाठी आमदार कार्लुस फेरेरा यांचा सल्ला घेणार, असे त्यांनी सांगितले.
हा केवळ फोंडा पोटनिवडणुकीपूर्ता विषय नाही. लोकशाही नष्ट करण्याच्या प्रक्रियेचा हा भाग आहे. लोकांचे अधिकार सांभाळण्याच्या ज्या घटनात्मक संस्था आहेत; त्यांचा राजकारणासाठी गैरवापर भाजप सरकार करीत आहे.
पोटनिवडणुकीत भाजपा विरोधात मतदान करून कॉंग्रेसला विजयी करण्याचे फोंडेकरांनी निश्चित केले होते. मतदानाला तोंड देण्याऐवजी पळून जाण्याचा हा प्रकार आहे, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमीत पाटकर म्हणाले.