३० नगरसेवकांसह आयुक्तांना नोटीस; आज सुनावणी

पणजी: मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाल्याचा दावा करत पणजी महानगरपालिका (CCP) निवडणुकीला उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विष्णू नाईक यांच्यासह अन्य तिघांनी ही याचिका दाखल केली असून, यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
प्रतिवाद्यांना नोटीस
याचिकाकर्त्यांनी सीसीपी (CCP) आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) आणि नवनिर्वाचित ३० नगरसेवकांना या प्रकरणी प्रतिवादी केले आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणुकीची पार्श्वभूमी:
पणजी महापालिकेच्या ३० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६९.०७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पुरस्कृत पॅनलने २७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले, तर उत्पल पर्रीकर यांच्या ‘आमी पणजेकार’ पॅनलला केवळ ३ जागांवर विजय मिळवता आला होता. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पार पडलेल्या मतमोजणीनंतर हे निकाल जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातमी अपडेट होत आहे.