पर्वरी फ्लायओव्हर पूर्ततेसाठी​ ऑक्टोबरची डेडलाईन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 mins ago
पर्वरी फ्लायओव्हर पूर्ततेसाठी​ ऑक्टोबरची डेडलाईन

पर्वरीतील महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : पर्वरी येथील फ्लायओव्हरच्या कामामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, कामाचा आढावा घेण्यासाठी आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, कंत्राटदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी आता ऑक्टोबर २०२६ पर्यंतची नवी मुदत देण्यात आली आहे.
पर्वरीचे आमदार तथा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक घेतली. फ्लायओव्हरचे काम सुरुवातीला अत्यंत वेगाने सुरू होते, मात्र आता या कामाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गांनी वळवताना येणाऱ्या अडचणींवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पावसाळ्यात पाणी साचल्यास किंवा रस्ते खराब असल्यास वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पर्यायी मार्गांची आणि सर्व्हिस रोडची कामे अद्याप अपूर्ण असून, ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यावर भर दिला जाणार आहे.
वाहतूक वळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याने कोंडीत भर पडत आहे. या सर्व तांत्रिक अडचणी आणि पावसाळ्यातील सुरक्षा उपायांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, अशी माहिती मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
वाहतुकीचे तीनतेरा
फ्लायओव्हरच्या कामामुळे पर्वरीतील रस्ते एकेरी करण्यात आले आहेत. म्हापशाहून पणजीकडे जाणारी वाहने महामार्गावरून जातात. टोयोटा शाेरूमजवळ तसेच टीव्ही​एस शोरूमजवळ रस्ता अत्यंत अरुंद ठेवल्यामुळे एकावेळी एकच मोठे वाहन जाऊ शकते. याच भागात तसेच मॉलजवळ काही वाहने रस्त्यालगत उभी केलेली असतात. त्यामुळे वाहनांची गती मंदावते आणि वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीत एखादी अॅम्बुलन्स अडकली, तरी तिला जाण्यासाठी जागा नसते. चर्चजवळील जंक्शनवर एकच वाहतूक पोलीस असतो. या भागात होमगार्ड तैनात करावेत, अशी मागणी होत आहे.
बायपास उतरणीवर अपघाताची शक्यता
पणजीहून म्हापशाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी चोगम रस्त्यावरून पुढे जाणारा बायपास हा एकमेव पर्याय आहे. ज्या ठिकाणी बायपास महामार्गाला मिळतो, त्या ठिकाणी सध्या खोदकाम सुरू आहे. भलेमोठे चर मारून बॅरिकेड्स लावल्यामुळे उतरणीवरून महामार्गाकडे वेगाने येणाऱ्या वाहनांची गती अचानक कमी करावी लागते. रात्रीच्या वेळी एखादे वाहन भरधाव सरळ खाली उतररले तर येथे अपघात हाेण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वाहनाचा वेग कमी करण्याची सूचना देणारे फलक उतरणीवर लावणे गरजेचे आहे.

हेही वाचा