
पणजी : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) (GCCI) आणि डब्ल्यूपीयू गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात शास्त्रज्ञ (Scientist) डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) यांना 'गोमंत गौरव सन्मान' जाहीर करण्यात आला आहे. सत्कार सोहळा १६ एप्रिल २०२६ रोजी ४ वाजता कला अकादमीत (Kala Academy) होणार असल्याची माहिती चेंबरच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी दिली.
बुधवारी पणजीत (Panjim) झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी संजय आमोणकर, शशिकांत जोशी, डॉ. श्रुती निगुडकर डॉ. विजयन करीपल उपस्थित होते. धोंड यांनी सांगितले की, सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आणि 'वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदे'चे माजी महासंचालक डॉ. माशेलकर यांचा हा गौरव, त्यांच्या माशेल या गावापासून सुरू झालेला आणि जागतिक विचारवंत बनण्यापर्यंतचा हा थक्क करणारा प्रवास, तसेच कल्पकतेवर आधारित सर्वसमावेशक विकासाचे त्यांनी जगासमोर उभे केलेले आदर्श कार्य, यासाठी करण्यात येत आहे.
'गांधीयन इंजिनिअरिंग: मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर' (कमी संसाधनातून जास्तीत जास्त लोकांसाठी जास्त लाभ) या तत्त्वज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या माशेलकरांनी नाविन्यपूर्ण संशोधनाला सामाजिक परिवर्तनाची एक शक्ती म्हणून नवी ओळख दिली आहे.
त्यांचे यश आगामी पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक प्रकाशस्तंभ ठरत राहील. हा पुरस्कार सोहळा 'गोवा २०३७' परिषदेचा एक भाग आहे. राज्याच्या विकासाला 'विकसित भारत @२०४७' या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे एक धोरणात्मक व्यासपीठ आहे.
संजय आमोणकर यांनी सांगितले की, 'गोवा २०३७' परिषद हे एका एकात्मिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या राज्याला आकार देण्यासाठी उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. परिषदेत रिइमॅजिनिंग गोवास फ्युचर: बॅलन्सिंग इंडस्ट्री अँड इकॉलॉजी’ आणि ‘गोवा ॲज अ ग्लोबल नॉलेज हब: ब्रिजिंग अकॅडेमिया अँड इंडस्ट्री’ असे संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहेत. गोव्याला देशासमोर एक आदर्श राज्य म्हणून उभे करण्याच्या उद्देशाने या दोन्ही चर्चासत्रांची आखणी करण्यात आल्याचे आमोणकर यांनी सांगितले.