फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक उच्च न्यायालयाने केली रद्द

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
29 mins ago
फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक उच्च न्यायालयाने केली रद्द

पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Ponda Assembly by-election)  मतदानाला केवळ एक दिवस बाकी असताना गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने (High Court)  फोंडा पोटनिवडणूकच रद्द केली. त्यामुळे उद्या ९ एप्रिल रोजी होणारी मतदान प्रक्रिया आता होणार नाही.  

विद्यमान विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यासाठी एक वर्षांचा कमी कालावधी असल्याचे नमूद करीत फोंड्यातील पोटनिवडणून रद्द करावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  प्रितम हरमलकर आणि अंकिता कामत यांनी दाखल केलेली याचिका ग्राह्य धरताना  न्यायालयाने निवडणूक अधिसूचनाच रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

या आदेशानंतर ९ एप्रिल रोजी होणारी मतदान प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात आली आहे.  त्यामुळे सुरू असलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. संबंधित याचिकेमधून निवडणूक अधिसूचनेवर आक्षेप घेण्यात आला होता. 

दरम्यान, पुढील प्रक्रिया काय असेल याबाबत निवडणूक आयोग व प्रशासनाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

उद्या फोंडा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार होते. निवडणुकीत भाजपतर्फे (BJP) रितेश नाईक, कॉंग्रेस पक्षातर्फे (Congress)  केतन भाटीकर तर आम आदमी पार्टीतर्फे (Aap) गीतेश नाईक हे उमेदवार रिंगणात आहेत. गेले कित्येक दिवस पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू होता.

पोस्टल मतदान झाले होते. घरोघरी प्रचार, कोपरा बैठका व जाहीर सभा यांद्वारे उमेदवारांनी प्रचार चालवला होता. भाजपचे गोवा प्रभारी तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती. मात्र, आता निवडणूकच रद्द झाली आहे. 

हेही वाचा