कार्यशक्ती सर्व्हेक्षण अहवालातून माहिती: एका वर्षात महिला कार्यशक्तीत १.३ टक्क्यांची भर

पणजी : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमावणाऱ्या महिलांच्या संख्या वाढली आहे. एका वर्षात विविध क्षेत्रात नोकरी, रोजगार करणाऱ्या महिलांच्या प्रमाणात १.३ टक्क्यांनी वाढली आहे. २०२४ मध्ये राज्यातील कार्यशक्तीत महिलांचे प्रमाण २१.२ टक्के होते. २०२५ मध्ये ते वाढून २२.५ टक्के झाले आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याच्या कार्यशक्ती सर्व्हेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यासाठी खात्याने देशभरातील १.४८ लाख कुटुंबातील ३.५ लाख हून अधिक महिलांचे सर्वेक्षण केले होते.
खात्याने देशातील १५ वर्षांवरील पुरुष आणि महिलांचे सर्व्हेक्षण केले होते. अहवालानुसार, राज्यातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. देशात महिला कार्यशक्तीचे सरासरी प्रमाण २६.३ टक्के आहे. याआधी राज्यात २०२२ मध्ये हे प्रमाण १७ टक्के, २०२३ मध्ये २१.९ टक्के होते. राज्याच्या कार्यशक्तीत महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी असणाऱ्या क्रमवारीत गोवा पाचव्या क्रमांकावर आहे. बिहार येथे हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच १५.५ टक्के आहे.
संपूर्ण देशात सिक्कीम येथे एकूण कार्यशक्तीत महिलांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५०.६ टक्के आहे. त्या खालोखाल नागालँड (४९.५ टक्के), हिमाचल प्रदेश (४८.८ टक्के), अरुणाचल प्रदेश (४४.५ टक्के) मेघालय (४६ टक्के) मेघालय (३९.८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर हरियाणा (१५.९ टक्के), उत्तर प्रदेश (१६.५ टक्के) आणि पंजाब (२२.३ टक्के ) यांचा क्रमांक लागतो. केंद्र शासित प्रदेशात अंदमान, जम्मू आणि काश्मीरमध्ये महिला कार्यशक्तीचे प्रमाण अधिक आहे. तर दिल्ली, लक्षद्वीप येथे ही प्रमाण कमी आहे.
गोव्यात वेतनदरात पुरुषांचा वरचष्मा
गोव्यात ग्रामीण भागात महिला कार्यशक्तीचे प्रमाण २२.४ टक्के, तर शहरी भागात २२.५ टक्के इतके आहे. राज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांना मिळणारे वेतन कमी आहे. पुरुषांना महिन्याला सरासरी ३०,६७८ रुपये तर महिलांना २४,४४० हजार रुपये वेतन मिळत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.