स्वप्नील वाळके खून प्रकरण : लुटीच्या उद्देशाने निर्दोषाची हत्या केल्याचे निरीक्षण

मडगाव : मडगाव (Margao) येथील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या २०२० मधील हत्या (Murder) प्रकरणातील मुख्य संशयित ओंकार पाटील याला न्यायालयाने दिलासा दिला नाही. हा दरोडा नसून सुनियोजित हत्या असल्याचे निरीक्षण नोंदवत दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने (South Goa District and Session Court) संशयित पाटील याचा जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावला.
मडगावच्या भर बाजारातील (Market) दुकानात घुसून कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांची गोळ्या झाडून आणि चाकूने वार करून २ सप्टेंबर २०२० रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुस्तफा शेख, इव्हेंडर रॉड्रिग्ज आणि ओंकार पाटील यांच्यासह अन्य काही संशयितांवर गुन्हे दाखल आहेत.
आरोपपत्रानुसार, संशयित ओंकार पाटील हा या संपूर्ण कटाचा मुख्य भाग होता. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार ओंकार पाटीलने इतर संशयितांसह बिहारला जाऊन हत्येसाठी वापरलेले पिस्तूल खरेदी केले होते. हत्येपूर्वी संशयितांनी मडगाव जवळील रावणफोंड येथे गोळीबाराचा सराव केला होता.
ज्याचे अडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. या गुन्ह्यासाठी वापरलेली बोलेरो गाडी चोरण्यातही ओंकारचा सहभाग होता, असा आरोप आहे.
या खटल्यात अद्याप सुमारे १०० साक्षीदारांची साक्ष होणे बाकी आहे. संशयिताला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, ही भीती न्यायालयाने ग्राह्य धरली. तसेच वारंवार अर्ज दाखल करून खटल्याला उशीर करत असल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे.
संशयित ओंकार पाटीलने यापूर्वीही अनेकदा जामिनासाठी प्रयत्न केले होते. परंतु गुन्ह्याचे गांभीर्य पाहून ते फेटाळण्यात आले. जामीन अर्जावर निर्णय घेताना विलंबाचा फायदा संशयिताला दिला जाऊ शकत नाही. मृत व्यक्तीच्या कुटुंबांच्या हिताचा विचारही करणे आवश्यक आहे.
मृत व्यक्तीची कोणतीही चूक नसताना केवळ लुटीच्या उद्देशाने त्याची हत्या करण्यात आली. हा केवळ दरोडा नसून दिवसाढवळ्या केलेला सुनियोजित खून होता, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संशयित ओंकार पाटील याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.