सर्वत्र हळहळ व्यक्त

काणकोण : घरात आई, एक तिच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठी मानसिकदृष्ट्या कमकुवत बहीण तर एक भाऊ वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामाला जातो. या सर्वांची लाडकी, शिकायला हुशार तसेच विद्यार्थी प्रिय सहाय्यक प्राध्यापिका सुचिता सुनिल बांदेकर (२७ वर्षे) यांनी आज बुधवारी सकाळी माशे (Mashem-Canacona) येथे कारच्या धडकेत जीव गमावला.
अपघाताची (Accident) माहिती मिळताच गावचे लोक तसेच जवळच्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. कारने ठोकर दिल्याने सुचिता चालवित असलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त कारचे मालक आपल्या कुटुंबीयांना गोव्यातील (Goa) विमानतळावरून (Airport) घेऊन कारवारला जात होते. माशे येथे पोहोचताच हा अपघात घडला. कारमधील व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. काणकोण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावाच्या जिल्हा इस्पीतळात पाठवला.
गावातील सर्वांची आवडीची असलेल्या सुचिताला कॉलेजमध्ये (College) शिकवायला जाताना बस वेळेवर मिळत नसल्याने; तिने हल्लीच दुचाकी घेतली होती. गावच्या सर्व कार्यक्रमात ती सहभागी व्हायची असे लोलये पोळे पंचायतीचे पंच सदस्य सचिन नाईक यांनी सांगितले.
श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाची विद्यार्थीनी व नंतर महाविद्यालयाची सहाय्यक प्राध्यापिका (लेक्चर बेजीस) म्हणून कोंकणी विषय शिकवणारी सुचिता विद्यार्थी प्रिय होती. महाविद्यालयातील प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू आहेत. मात्र, तिला आज सुपरव्हिजन नव्हते तरी ती कॉलेजमधील विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसांत सुद्धा नोट्स द्यायला यायची.
कॉलेजमध्ये होत असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ती करायची. उत्कृष्ट नाट्य कलाकार असलेली सुचिता यांनी गेल्या आठवड्यात देळे येथे झालेल्या नाट्यप्रयोगात भाग घेतला होता. आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली होती. तोच तिचा नाटकातील अखेरचा अभिनय ठरला; असे श्री मल्लिकार्जुन व चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे वरीष्ठ कारकून रामदास सावंत यांनी सांगितले.
नीट परिक्षा उत्तीर्ण होऊन ती या महाविद्यालयात शिकवत होती. कष्टाळु, जिद्धी व सुस्वभावी सुचिता आज आपल्यापासून गेल्याचे दु:ख प्रा. विविध पावस्कर यांनी व्यक्त केले. सुचिता बांदेकर यांच्या मृत्यूची माहिती मिळताच परिक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली.