
पणजी : मागील दोन वर्षे देशात सरासरीपेक्षा अधिक मान्सूनच्या पावसाची नोंद झाली होती. मात्र, यंदा सरासरीच्या ९४ टक्के मान्सून असण्याची शक्यता 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केली आहे. 'एल निनो'च्या प्रभावामुळे मान्सूनची सरासरी घटण्याची शक्यता संस्थेने वर्तवली असून, मध्य आणि वायव्य भारतात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा अधिकृत अंदाज अद्याप जारी केलेला नाही.
स्कायमेट संस्थेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतामध्ये यंदा सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडू शकतो. या अंदाजात ५ टक्के घट किंवा वाढ होऊ शकते. जून महिन्यात पावसाचे प्रमाण स्थिर असेल; मात्र एल निनोमुळे जुलै ते सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मान्सून काळात देशात सरासरी ८६८.९ मिलीमीटर पावसाची नोंद होते, यंदा ती ८१७ मिमी पर्यंत राहण्याची शक्यता आहे.
सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांदरम्यानचा मान्सून हा 'सामान्य' समजला जातो. यंदा सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ४० टक्के, तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता १० टक्के आहे. प्रशांत महासागरात दीड वर्षे 'ला निना'ची परिस्थिती होती, मात्र आता तिथे 'एनसो न्यूट्रल' स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात 'एल निनो' सक्रिय होण्याची शक्यता असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
गोव्यात पावसाचे प्रमाण कमी?
संस्थेने देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ईशान्येकडील राज्यांत ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता संस्थेने वर्तवली आहे.