खून करून बेडखाली लपवला मृतदेह, तिघांना अटक

नवी दिल्ली: दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय विवाहित महिलेची तिच्याच २२ वर्षीय प्रियकराने निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह एका पेईंग गेस्ट (PG) रूममधील बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवला. या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण दिल्ली हादरली असून, पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या काका आणि एका मित्राला अटक केली आहे. अनैतिक संबंध आणि त्यातून उद्भवलेली विकृत मागणी या हत्येमागील मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला मंगोलपुरी परिसरात घरकाम करत होती. ती विवाहित असून तिला तीन मुले आहेत. तिचा त्याच परिसरातील एका चिकन शॉप चालवणाऱ्या दीपक नावाच्या २२ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हे दोघे मंगोलपुरीच्या पत्थर मार्केटमधील एका पीजी रूममध्ये भेटायला गेले होते. ही खोली दीपकने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून काही तासांसाठी मागून घेतली होती. मात्र, काही वेळातच तिथे दीपकचे ५० वर्षीय काका सुरेंद्र आणि त्यांचा ५२ वर्षीय मित्र जोगिंदर हेदेखील पोहोचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकच्या काकांनी आणि त्यांच्या मित्राने पीडित महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र, महिलेने या मागणीला कडाडून विरोध केला आणि संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या दीपकने महिलेला जमिनीवर पाडून तिला मारहाण केली. त्याने महिलेचे तोंड ब्लँकेटने दाबले आणि तिचा गळा आवळून तिची हत्या केली. या संपूर्ण कृत्यादरम्यान त्याचे काका आणि त्यांचा मित्र खोलीच्या बाहेर लक्ष ठेवून होते. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी महिलेचा मृतदेह बेडच्या खाली असलेल्या स्टोरेज बॉक्समध्ये कोंबला आणि तिथून पळ काढला.
या धक्कादायक घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा संध्याकाळी ७ च्या सुमारास पीजीचा मालक खोलीत परतला. त्याला खोलीचा दरवाजा उघडा दिसला आणि दीपक गायब होता. खोलीत प्रवेश केल्यानंतर त्याला बेडच्या बॉक्समधून एका महिलेचा पाय बाहेर आलेला दिसला. त्याने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बेडचा बॉक्स उघडला असता, त्यात महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. महिलेच्या कपाळावर जखमा होत्या आणि गळ्यावर गळा आवळल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तपासचक्र वेगवान करत अवघ्या २४ तासांच्या आत तिन्ही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासात असे समोर आले आहे की, दीपक विवाहित असूनही त्याचे या महिलेशी संबंध होते. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे नमुने गोळा केले आहेत.