अमेरिकेकडून दोन आठवड्यांसाठी युद्ध स्थगितीची घोषणा

होर्मुझची सामुद्रधुनी तात्पुरती खुली करण्यास इराण तयार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28 mins ago
अमेरिकेकडून दोन आठवड्यांसाठी युद्ध स्थगितीची घोषणा

तेहरान : इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सशर्त तयारी दाखवल्याने, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोन आठवड्यांसाठी युद्ध स्थगितीची घोषणा करण्यात आली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या घोषणेनंतर अमेरिका-इराण तणावात तात्पुरती शिथिलता आली असून, इराणने दोन आठवड्यांच्या युद्धविरामास मान्यता दिली आहे. या कालावधीत महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनी (Strait of Hormuz)  मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यास इराण तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दलांच्या समन्वयातून पुढील दोन आठवड्यांसाठी या समुद्री मार्गावर सुरक्षित वाहतूक सुनिश्चित केली जाईल. दरम्यान, या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी इस्लामाबाद ( Islamabad ) येथे चर्चेची प्रक्रिया सुरू होणार आहे.

युद्धविराम लेबनॉनला लागू नाही : नेतान्याहू 

दुसरीकडे, बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या कार्यालयाने या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असला, तरी हा युद्धविराम लेबनॉनला लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या दोन आठवड्यांच्या युद्धविरामामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी चर्चांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे

हेही वाचा