लोकशाहीवरची अढळ श्रद्धा; निवडणूक रद्द झाल्याचे माहीत नसलेला 'तो' एकमेव मतदार!

फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्याची माहिती कदाचित 'त्याच्या'कडे पोहोचलीच नसल्याने उडाला गोंधळ.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th April, 12:41 pm
लोकशाहीवरची अढळ श्रद्धा; निवडणूक रद्द झाल्याचे माहीत नसलेला 'तो' एकमेव मतदार!

पणजी : एकीकडे राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, दुसरीकडे लोकशाहीप्रती असलेली सामान्यांची निष्ठा किती गाढ असते, याचा प्रत्यय आज खांडेपार येथे आला. फोंडा विधानसभा पोटनिवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशाने काल रद्द झाली, ही बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली असली, तरी खांडेपार येथील एका ज्येष्ठ मतदारापर्यंत ती पोहोचली नव्हती.

आज सकाळी ९ एप्रिल रोजी, मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी हा मतदार मोठ्या उत्साहात खांडेपार येथील मतदान केंद्रावर पोहोचला. केंद्राबाहेर नेहमीसारखी गर्दी नाही, पोलिस बंदोबस्त नाही की रांगा नाहीत, हे पाहून तो काहीसा गोंधळला. रिकामे केंद्र पाहून त्याने चौकशी केली असता, निवडणूक आदल्या दिवशीच रद्द झाल्याचे त्याला सांगण्यात आले.

वर्षानुवर्षे न चुकता मतदान करणाऱ्या या मतदाराच्या चेहऱ्यावरील उत्साह हे ऐकताच मावळला. मतदान रद्द झाले? असा प्रश्न विचारताना त्याच्या डोळ्यांत एक प्रकारची रिकामी भावना दाटून आली होती. टीव्ही, सोशल मीडिया आणि बातम्यांपासून दूर असलेल्या या मतदारासाठी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नव्हती, तर आपल्या हक्काचा वापर करण्याचा तो एक सण होता. लोकशाहीप्रती असलेली ही निष्पाप श्रद्धा पाहून तिथे उपस्थित असलेले कर्मचारीही क्षणभर भावूक झाले. निवडणूक प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव थांबली असली, तरी या एका मतदाराने मात्र लोकशाहीवरील आपली अढळ निष्ठा सिद्ध केली.

दरम्यान सोशल मिडियावर या बाबांचा फोटो सध्या तूफान व्हायरल होतोय. अनेक जण त्यांना त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या जाणिवेचे कौतुक करत आहेत. एखाद्या गोष्टीवर किती ती श्रद्धा असावी.. इतकी साधी भोळी ही कदाचित शेवटचीच पिढी असल्याचे एकाने म्हटले आहे. 

हेही वाचा