पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित मॉड्यूलचा दहशतवादी हल्ल्याचा कट उघड

दिल्लीतील मंदिर, ढाबा आणि लष्करी तळ होते निशाण्यावर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित मॉड्यूलचा दहशतवादी हल्ल्याचा कट उघड

नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी (Pakistan's intelligence agency ISI) संबंधित मॉड्यूलने दिल्लीतील ऐतिहासिक मंदिर (historic temple in Delhi), दिल्ली-सोनीपत महामार्गावरील (Delhi-Sonipat highway)  प्रसिद्ध ढाबा तसेच हरियाणातील लष्करी तळावर  (military camp in Haryana) हल्ल्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell)  ‘गँग बस्ट ऑपरेशन २.०’ अंतर्गत विविध राज्यांतून अटक केलेल्या नऊ संशयितांच्या चौकशीत हा मोठा खुलासा झाला.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहजाद भट्टी मॉड्यूलशी संबंधित आरोपींपैकी एकाने दिल्लीतील ऐतिहासिक मंदिराची रेकी करून परिसराचे छायाचित्र पाकिस्तानस्थित हँडलर्सना सोशल मीडियाद्वारे पाठवले होते. मंदिर परिसरात तैनात पोलीस आणि निमलष्करी दलांवर गोळीबार करून भीती आणि गोंधळ निर्माण करण्याचा कट होता, असे तपासात समोर आले आहे.

याशिवाय, दिल्ली-सोनीपत महामार्गावरील हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या लोकप्रिय ढाब्यावर ग्रेनेड हल्ला करण्याचाही कट रचण्यात आला होता. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, हरियाणातील हिसार येथील एका लष्करी छावणीचीही रेकी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.  त्या परिसराचे व्हिडीओ सीमापार हँडलर्सना पाठवण्यात आले होते. उत्तरप्रदेशातील काही पोलीस ठाण्यांनाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, देशविघातक कटामागील संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हेही वाचा