तामिळनाडूत राजकीय भूकंपाची शक्यता

चेन्नई : तमिळनाडूच्या राजकारणात (Tamil Nadu Politics) गेल्या २४ तासांत मोठी उलथापालथ घडताना दिसत असून, दीर्घकाळ कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्या डीएमके आणि एआयएडीएमके या द्रविड पक्षांमध्ये संभाव्य राजकीय समझोत्याच्या चर्चांना वेग आला आहे. अभिनेता-राजकारणी विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK, टीव्हीके) पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आघाडीला सरकार स्थापण्याची संधी दिल्यास टीव्हीकेचे पक्षप्रमुख अभिनेता विजय यांनी आपल्या पक्षाचे १०८ आमदार राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एआयएडीएमके (AIADMK) आणि डीएमके (DMK) यांच्यात राजकीय समझोत्याच्या घडामोडींनंतर विजय यांनी मोठा इशारा देत, “जर डीएमके किंवा एआयएडीएमकेने सरकार स्थापन केले, तर टीव्हीकेचे सर्व १०८ आमदार राजीनामा देतील,” असा पवित्रा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, डीएमकेने गुरुवारी सायंकाळी ठराव मंजूर करून पक्षाध्यक्ष एम. के. स्टालिन यांना “सध्याच्या राजकीय परिस्थितीत आवश्यक आणि तातडीचे राजकीय निर्णय घेण्याचे” अधिकार दिले. या ठरावात राज्याला पुन्हा निवडणुका नको असल्याचे नमूद करत स्थिर सरकारची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच द्रविड चळवळीच्या विचारांना विरोध करणाऱ्या शक्तींना रोखण्याची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
डीएमके, एआयएडीएमकेचे हातमिळवणीचे संकेत
राजकीय विश्लेषकांच्या मते, या ठरावामुळे डीएमके एआयएडीएमकेसोबत हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून एकमेकांविरोधात लढणारे हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
टीव्हीकेला बहुमतासाठी हवेत १० आमदार
विधानसभा निवडणुकीत टीव्हीके १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ जागांपासून तो १० जागांनी दूर आहे. त्यामुळे राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापनेचा दावा करण्यास नकार दिला. विजय यांनी दोन दिवसांत दोनदा राज्यपालांची भेट घेतली; मात्र आवश्यक बहुमताचा पुरावा नसल्याचे राजभवनाने स्पष्ट केले.
कॉंग्रेसचा टीव्हीकेला पाठिंबा
दरम्यान, काँग्रेसने डीएमकेसोबतची २२ वर्षांची युती तोडून टीव्हीके ला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. विजय यांनी डाव्या पक्षांसह काही प्रादेशिक पक्षांशी संपर्क साधला असला, तरी अद्याप कोणत्याही पक्षाने औपचारिक पाठिंबा दिलेला नाही.
एआयएडीएमकेमध्ये मतभेद
एआयएडीएमकेमध्येही मतभेद उफाळून आले असून, काही नेते टीव्हीकेला पाठिंबा देण्याच्या बाजूने आहेत, तर वरिष्ठ नेते त्यास विरोध करत आहेत. आमदार फोडाफोडीच्या भीतीने एआयएडीएमकेच्या आमदारांना पुदुच्चेरीतील रिसॉर्टमध्ये हलविण्यात आल्याची चर्चा आहे.
उदयनिधी स्टालिन यांच्या भविष्याची चिंता
सूत्रांच्या माहितीनुसार, विजय मुख्यमंत्री झाल्यास ते पुढील दशकभर तमिळनाडूच्या राजकारणावर वर्चस्व गाजवू शकतात, अशी भीती डीएमकेतील काही गटांना वाटत आहे. त्यामुळे उदयनिधी स्टालिन यांच्या भविष्यातील नेतृत्वाच्या आकांक्षांवर परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.