
चेन्नई : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) राजकारणात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून; अभिनेता विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाला बहुमतासाठी अजूनही आवश्यक संख्याबळाची गरज आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष व्हीसीकेचे (VCK) प्रमुख थोल तिरुमावलवन यांच्या निर्णयाकडे लागले आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला ११८ आमदारांचा जादुई आकडा गाठायचा असून; व्हीसीकेचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे.
शुक्रवारी व्हीसीकेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. मात्र, टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत तिरुमावलवन यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, अंतिम निर्णय शनिवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, व्हीसीकेने टीव्हीकेसमोर मंत्रिपदांची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तिंदिवनम आणि कट्टुमन्नारकोइल मतदारसंघातून विजयी झालेले वन्नियारासू आणि जोथिमणी या दोन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी व्हीसीकेने केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, तिरुमावलवन यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतही चर्चांना उधाण आले आहे.
तिरुमावलवन यांना पुन्हा विधानसभेत आणण्यासाठी टीव्हीकेने त्रिची ईस्ट मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या सक्रिय राजकारणात पुनरागमन करण्यास उत्सुक असलेले तिरुमावलवन पोटनिवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
याआधी त्यांनी कट्टुमन्नारकोइलमधून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र नंतर त्यांनी माघार घेत दिवंगत दलित नेते एल. इलायपेरुमल यांचे पुत्र जोथिमणी यांना उमेदवारी दिली होती.
दरम्यान, व्हीसीकेने निर्णय एक दिवस पुढे ढकलल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. टीव्हीकेने पाठिंब्याचा विशिष्ट नमुना मागितला आहे. आमदारांच्या स्वाक्षऱ्या आधी वेगळ्या स्वरूपात घेतल्या होत्या. त्यामुळे आमदार आज रात्री चेन्नईला परतत आहेत,” अशी माहिती व्हीसीकेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
शुक्रवारी रात्री तिरुमावलवन यांनी कार्यवाह मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. डीएमके (DMK) सोबत जवळपास दशकभर युती राहिली आहे. त्यामुळे आम्हाला मैत्रीपूर्ण पद्धतीने वेगळे व्हायचे आहे,” असे तिरुमावलवन यांनी स्पष्ट केले.