कोविडनंतर आता क्रूझ जहाजावर ‘हंताव्हायरस’चा कहर!; ८ बाधित, ३ जणांचा मृत्यू

जहाजातील प्रवाशांमुळे १२ देशांत व्हायरस पोहोचण्याचा धोका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
कोविडनंतर आता क्रूझ जहाजावर ‘हंताव्हायरस’चा कहर!; ८ बाधित, ३ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन:  कोविडनंतर आता जगभरात पुन्हा एका संसर्गजन्य आजाराने चिंता वाढवली आहे.  क्रूझ जहाजावरील प्रवाशांमध्ये आढळलेल्या ‘हंताव्हायरस’मुळे (Hantavirus)  आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ८ मे पर्यंत या व्हायरसचे ८ बाधित सापडले असून, त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील ६ रुग्णांमध्ये ‘अँडीज व्हायरस’ (Andes Virus - ANDV) प्रकाराचा हंताव्हायरस प्रयोगशाळेतून निश्चित झाला आहे. जहाजातील प्रवाशांमुळे १२ देशांत हा व्हायरस पोहोचण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, २ मे २०२६ रोजी एका डच ध्वजांकित क्रूझ जहाजावर गंभीर श्वसनविकाराची लागण झालेले प्रवासी आढळून आले. ८ मे पर्यंत संख्या वाढत ८ वर गेली तर तीन प्रवासी मृत्यू पावले. हा मृत्यूदर तब्बल ३८ टक्के असल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO)  माहितीनुसार, जहाजावर एकूण १४७ प्रवासी आणि कर्मचारी होते, तर ३४ जण यापूर्वीच विविध ठिकाणी उतरले होते. बाधितांपैकी काहींना दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंडमधील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असून; त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) सुरू करण्यात आली आहे. सेंट हेलेना येथे उतरलेल्या प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना स्वतःच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात देण्यात आल्या आहेत. तसेच एका बाधितासोबत विमानप्रवास केलेल्या प्रवाशांचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, हे क्रूझ जहाज ६ मे रोजी केप व्हर्डेमधून स्पेनच्या कॅनरी आयलंड्सकडे रवाना झाले असून; तेथे प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. 

या संसर्गाचा उगम आणि पहिल्या रुग्णाला संसर्ग कसा झाला, याचा शोध अर्जेंटिना आणि चिलीच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने घेतला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक पातळीवरील धोका सध्या “कमी” असल्याचे म्हटले असले, तरी जहाजावरील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी धोका “मध्यम” असल्याचे स्पष्ट केले आहे.

उतरलेल्या यादीत अनेक देशांचे प्रवासी 

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने जहाजावरून सेंट हेलेना येथे उतरलेल्या प्रवाशांची यादी जाहीर केली आहे. त्यात कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, न्यूझीलंड, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, अमेरिका, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, केप वर्डे आणि नेदरलँड्स या देशांचा समावेश आहे. त्यामुळे व्हायरस जगभर पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा