इराण युद्ध: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमध्ये ३१ जणांचा मृत्यू, इराणकडून अमेरिकेला इशारा

इस्रायली सैन्याचे लेबनॉनमधील अनेक गावांवर हल्ले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 hours ago
इराण युद्ध: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमध्ये ३१ जणांचा मृत्यू, इराणकडून अमेरिकेला इशारा

तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला असून; इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई आणि भू-हल्ल्यांत किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. (Israeli  attacks in Southern Lebanon killed 31 people.) ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील अनेक गावांवर जोरदार हल्ले चढवत नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले.

दक्षिण लेबनॉनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून; इस्रायली भूसेना अधिक खोलवर प्रवेश करत असल्याने हजारो नागरिक सुरक्षित स्थळी पलायन करत आहेत. अनेक भागांत स्फोटांचे आवाज आणि धुराचे लोट दिसून येत असल्याची माहिती आहे.

अमेरिकेकडून युद्धविरामाचे उल्लंघन : इराण 

दरम्यान, इराणने अमेरिकेवर युद्धविरामाचे “उघड उल्लंघन” केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी दक्षिण इराणवर झालेल्या अमेरिकन हल्ल्यांमुळे शांतता चर्चांवर परिणाम झाल्याचे तेहरानमधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अमेरिकेवर आता “शून्य विश्वास” असल्याची प्रतिक्रिया इराणी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

व्यापक प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा 

इराणच्या सशस्त्र दलांच्या वरिष्ठ प्रवक्त्यांनीही कठोर इशारा देत सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलने पुन्हा युद्ध छेडल्यास त्याला “यापेक्षा अधिक कठोर आणि व्यापक प्रत्युत्तर” दिले जाईल आणि त्याचे परिणाम प्रादेशीक सीमांपलीकडे जाणार आहेत.

याच दरम्यान, इराणचे उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद रेझा अरेफ यांनी अनेक आठवड्यांच्या निर्बंधांनंतर देशात इंटरनेट सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती दिली.

हेही वाचा