‘आठवी नापास’ ते दुबईतील अब्जाधीश : सतीश सानपाल यांची यशोगाथा

पत्नीला दरवर्षी दोन किलो सोने भेट : आलीशान रोल्स रॉयस, बुगाटी चिरॉन ताफ्यात

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
‘आठवी नापास’ ते दुबईतील अब्जाधीश : सतीश सानपाल यांची यशोगाथा

मुंबई : असे म्हटले जाते की, माणूस जितका उच्चशिक्षित असेल, तितका तो अधिक यशस्वी होतो. चांगली​ नोकरी, व्यवसायात यश हे सर्व उच्चशिक्षणामुळे मिळू शकते, असा समज आहे. मात्र मध्यप्रदेशमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील युवकाने अक्कलहुशारीने अब्जावधींचे साम्राज्य थेट दुबईत (Dubai) उभे केले आहे. विशेष म्हणजे हा तरुण केवळ आठवी शिकलेला आहे. त्याची यी यशोगाथा ओटीटीवरील ‘देसी ब्लिंग’ (Desi Bling) या शोमधून जगासमोर आली आणि ती पाहून सगळेच चकित झाले.


ओटीटीवरील ‘देसी ब्लिंग’ या शोमधून सध्या चर्चेत आलेले उद्योजक सतीश सानपाल (Satish Sanpal) आणि त्यांची पत्नी ताबिंदा सानपाल यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास अद्भुत आहे. सतीश सानपाल हे फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतले. अभ्यासात विशेष रस नसला, तरी मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द कायम होती, असे त्यांनी शोमध्ये सांगितले. अवघ्या १७व्या वर्षी जबलपूरमध्ये छोट्या किराणा आणि भाजीच्या दुकानापासून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली होती. तरुण वयातच शिक्षण सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आईकडून ५० हजार रुपये उधार घेऊन सुरू केलेले दुकान अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारात कमिशन एजंट म्हणून काम करत अनुभव मिळवला.



सुमारे १५ वर्षांपूर्वी एका मित्राच्या लग्नानिमित्त ते दुबईला गेले होते. तेथील व्यवसायाच्या संधी पाहून त्यांनी दुबईतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी सोन्याच्या व्यापारात नशीब अजमावले. मात्र त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला तो २०२० मधील करोना काळ. करोनामुळे जागतिक मंदीचे वातावरण असताना आणि दुबईतील रिअल इस्टेट बाजार कोसळलेला असताना सतीश यांनी मोठी जोखीम घेत आपली सर्व गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये केली. महासाथीनंतर मालमत्तांचे भाव प्रचंड वाढले आणि त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटींनी वाढले. आता ते ‘ANAX Holding’ या बहु-अब्ज डॉलर्सच्या समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.



पत्नीला दरवर्षी दोन किलो सोने भेट

सध्या सतीश सानपाल हे जगातील सर्वांत उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’मध्ये वास्तव्यास आहेत. मात्र ते लवकरच दुबई हिल्स परिसरातील ५० हजार स्क्वेअर फुटांच्या आलिशान बंगल्यात राहायला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलचीही मोठी चर्चा आहे. सतीश यांच्याकडे रोल्स रॉयस आणि बुगाटी चिरॉन (किंमत ५० कोटी रुपये) यासारख्या महागड्या गाड्यांचा ताफा आहे. त्यांनी आपल्या एका वर्षाच्या मुलीला सुमारे ५ कोटी रुपयांची कस्टमाइज्ड रोल्स रॉयस भेट दिली. तसेच पत्नीला दरवर्षी २ किलो सोने भेट देण्याची त्यांची परंपराही चर्चेत आहे.



मुलीच्या वाढदिनी रोल्स रॉयस भेट

या जोडप्याने त्यांच्या आलिशान गाड्यांच्या संग्रहाबद्दलही चर्चा केली. सतीश यांनी सांगितले की, बिंदाची अशी इच्छा होती की, आमची चिमुकली बेला प्रसिद्ध व्हावी. रोल्स-रॉयसने त्यांचे एक नवीन मॉडेल बाजारात आणले होते आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केले होते. कारण मला हा ब्रँड अत्यंत प्रिय आहे. माझ्याकडे आधीच या कंपनीच्या सहा गाड्या आहेत. व्यवस्थापकाने मला विचारले की, मला किती गाड्यांचे बुकिंग करायचे आहे? त्यावर मी म्हणालो, तीन; एक माझ्यासाठी आणि एक बेलासाठी. आम्ही बेलाची गाडी खास तिच्या आवडीनुसार गुलाबी रंगात सजवून घेतली आणि त्या गाडीच्या सीटवर तिचे नावही कोरून घेतले. ही गोष्ट प्रचंड व्हायरल झाली.


हेही वाचा