‘ते’ आक्षेपार्ह भाषण लिहिणाऱ्या माधव खट्टरला वास्को पोलिसांनी केली अटक

गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने माधव खट्टरला हरिद्वारमधून ताब्यात घेतले. रात्री उशिरा मोपा विमानतळावर आणण्यात आले. गौतम खट्टरचा शोध सुरू.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
‘ते’ आक्षेपार्ह भाषण लिहिणाऱ्या माधव खट्टरला वास्को पोलिसांनी केली अटक

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य संशयित गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला अटक केली आहे. गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तराखंडमधील हरिद्वार येथून बुधवारी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा विमानाने त्याला मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. या प्रकरणातील वादग्रस्त भाषणाचे लेखन माधवनेच केले असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी आता तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे.



वास्को येथे परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौतम खट्टर याने सेंट झेवियर यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखेने कार्यक्रमाच्या आयोजकांचे जबाब नोंदवले. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम खट्टरच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन, प्रवासाची व्यवस्था आणि मानधनाचे व्यवहार माधव खट्टरच सांभाळत होता. धक्कादायक बाब म्हणजे, समाजात तेढ निर्माण करणारे ते भाषण माधवनेच लिहून दिले होते आणि गौतमने ते फक्त वाचून दाखवले. इतकेच नव्हे तर, हे भाषण स्वतःच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यातही माधवचाच मुख्य सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.


Gautam Khattar's comments not only criticizing St. Francis Xavier but also  remarking on institutions operating under St. Xavier's name have sparked  debate. Is it appropriate for external spokespersons ...

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. गौतम खट्टर अद्याप फरार असला तरी पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. तो जिथे दिसेल तिथून त्याला अटक करून गोव्यात आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. गौतम परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्या विरोधात 'लूक आऊट' नोटीस जारी करण्यात आली आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई आणि गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



सध्या माधव खट्टरला वास्को पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून मूळ आरोपी गौतम खट्टरपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या अटकेमुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला मोठी गती मिळाली आहे. गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

हेही वाचा