डांबरीकरणास प्रारंभ : रस्त्यासाठी निवडणुकीवर घातला होता बहिष्कार

मार्ली-तिरवाळ रस्ता डांबरीकरणाच्या शुभारंभप्रसंगी मंत्री डॉ. रमेश तवडकर. सोबत सविता तवडकर, अजय लोलयेकर, सुनील पैंगीणकर, सतीश पैंगीणकर, महेश नाईक व इतर. (संजय कोमरपंत)
संजय कोमरपंत
काणकोण : पैंगीण पंचायत क्षेत्रातील मार्ली तिरवाळ हे गाव काही वर्षांपूर्वी काणकोण तालुक्यात नव्हे, गोवा राज्यात नव्हे, तर देशाच्या राजधानीपर्यंत चर्चेत आले होते. आपल्या गावांत रस्ता नाही, आदी रस्ता द्या व नंतरच मतदान करू, असा इशारा या गावच्या नागरिकांनी वारंवार दिला होता. मात्र त्यांची ही आर्त हाक कुणी ऐकली नव्हती. शेवटी २०१९ ला गावच्या नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला व मतदानावर बहिष्कार घातला.
लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्याने मार्ली तिरवाळ गाव दिल्लीपर्यंतच्या मुख्य निवडणूक कार्यालयापर्यंत चर्चेत आला होता. शंभर टक्के मतदान व्हावे या करिता निवडणूक आयोग झटत असतानाच या गावच्या नागरिकांनी मात्र निवडणुकीवरच बहिष्कार घालून निवडणूक आयोगाचे लक्ष मार्ली गावापर्यंत खेचून घेतले होते. त्यावेळचे जिल्हाधिकारी अजित रॉय, काणकोणचे उपजिल्हाधिकारी सगुण वेळीप, मामलेदार विनोद दलाल यांनी मार्ली गावी धाव घेऊन गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता तरी गावकरी जुमानले नव्हते. जोपर्यंत रस्ता नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुकीत मतदान नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. तेव्हापासून गोव्याच्या अभयारण्य मंडळ तसेच, बंगळुरूच्या वनविभागाकडून परवानगी घेऊन येथे रस्ता करण्यात आला होता.
आता तब्ब्ल ७ वर्षांनी या रसत्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याकरिता काणकोणचे आमदार तथा आदिवासी कल्याणमंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी गुरुवारी शुभारंभ केला. सुमारे ४ कोटी ८३ लाख रुपये खर्चून हे हॉटमिक्स डांबरीकरण होणार असून, सुरुवातीला गावचे बुधवंत तसेच वेळीप, कृष्ण गावकर व राम वेळीप यांनी नारळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला.
सुरुवातीला पंच रसिका वेळीप यांनी स्वागत केले. सरपंच सविता तवडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपसरपंच सुनील पैंगीणकर, जि. पं. सदस्य अजय लोलयेकर, पंच सतीश पैंगीणकर, महेश नाईक, प्रभाकर गावकर, दिवाकर पागी व इतर उपस्थित होते.
सकयले तिरवाळ येथेही होणार रस्ता!
मंत्री तवडकर यांनी सांगितले की, सकयले तिरवाळ रस्त्याचे सुद्धा हॉटमिक्स डांबरीकरण करण्यादृष्टीने गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयापासून, दिल्ली पंतप्रधान कार्यालयापर्यत फाईल मंजूर करून आणली आहे. सिंगल टेंडरमुळे सदर रस्त्याचे काम रखडले असून ते सुद्धा काही दिवसांत पूर्ण होईल.