
वास्को : बायणा, वास्को येथील रहिवासी गोपाळकृष्ण सुब्राय कामत यांना ‘रक्षा मंत्री पुरस्कार’ ('Defence Minister Award') प्रदान करण्यात आला आहे. २३ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित “इयर ऑफ नेव्हल सिव्हिलियन्स” या विशेष समारंभात संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ (Sanjay Seth) यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
गोपाळकृष्ण सुब्राय कामत (Gopalkrishna Subray Kamat) हे सध्या चिखली, वास्को येथील नेव्हल आर्मामेंट डेपो येथे कार्यरत आहेत. उत्कृष्ट कार्यपद्धती, शिस्तबद्धता आणि सेवाभाव यासाठी त्यांची निवड या सन्मानासाठी करण्यात आली.
कामत यांची कार्यनिष्ठा, वेळेचे काटेकोर पालन आणि जबाबदाऱ्यांप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांना सहकाऱ्यांमध्ये आदराचे स्थान आहे. साधेपणा आणि विनम्र स्वभावामुळे ते कुटुंबीय, मित्र आणि सहकारी यांच्यातही लोकप्रिय असल्याची माहिती त्यांच्या जवळच्यांनी दिली.
आपल्या यशाचे श्रेय कामत यांनी कुटुंबीय, मित्र आणि नेव्हल आर्मामेंट डेपो, गोवा येथील जनरल मॅनेजर भूपेंद्र शर्मा (INAS) यांचे मार्गदर्शन व पाठबळ यांचा विशेष उल्लेख केला. तसेच इतर अधिकारी व सहकाऱ्यांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. “वरिष्ठांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि प्रेरणादायी शब्द यामुळेच कामात आणि जीवनात प्रगती साधता आली,” असे त्यांनी नमूद केले.