उन्हाळ्यातील डोळ्यांची काळजी

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
11th April, 10:56 pm
उन्हाळ्यातील डोळ्यांची काळजी

उन्हाळा आला की शाळा लवकर सुटते आणि छान सुट्ट्या सुरू होतात. मग खेळ, सायकल, मित्रांसोबत धमाल आणि कैऱ्या खाण्याची मजा सुरू होते. पण या सगळ्या आनंदात कडक उन्हामुळे आपल्या नाजूक डोळ्यांना त्रास होऊ शकतो. डोळे लाल होणे, जळजळ होणे किंवा पाणी येणे असे त्रास टाळण्यासाठी, चला जाणून घेऊया, उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायची.

दुपारी घरातून बाहेर खेळायला जाणार असाल किंवा शाळेतून घरी येत असाल तर टोपी, हॅट , गॉगल वापरा. सूर्याची तीव्र किरणे थेट डोळ्यांवर पडली तर डोळे दुखू लागतात. दुपारी बाहेर जाणे शक्यतो टाळा. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर हळू हळू उष्णता कमी होते तेव्हा खेळायला जा. 

दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्याने डोळे धुवा. बाहेरून आल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा आणि डोळे धुणे खूप महत्त्वाचे आहे. घाणेरड्या हाताने डोळे कधीही चोळू नका!

मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीपासून थोडी सुट्टी घ्या

उन्हाळ्यात सुट्टीमध्ये मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर वाढतो. जास्त वेळ स्क्रीनकडे बघितले की डोळे थकतात आणि दुखतात. एक सोपा नियम लक्षात ठेवा - २०-२०-२० नियम.

नियम असा आहे -

दर २० मिनिटे स्क्रीन बघितल्यानंतर, २० सेकंद थांबा, आणि किमान २० फूट दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे बघा. म्हणजेच खिडकीतून बाहेर झाड किंवा आकाश बघा, फक्त २० आकडे मोजेपर्यंत. 

घरगुती उपाय

डोळ्यांना आराम देणारे काही सोपे उपाय खूप गुणकारी आहेत जे आपण घरी करू शकतो.

 काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्या तर थंडावा मिळतो.

 गुलाबपाण्याची घडी बंद डोळ्यांवर ठेवली असता जळजळ कमी होते. 

डोळे निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?

डोळे चांगले रहावे यासाठी गाजर,  तसेच उन्हाळ्यातील फळे आंबा, पपई खूप फायदेशीर आहेत. यात असलेले व्हिटॅमिन A डोळ्यांना हेल्दी ठेवते. 

आणि तुम्हाला डोळ्यांसाठीचा एक महत्त्वाचा उपाय आठवतो का बघा. अभ्यंग हा विषय आपण शिकलो तेव्हा हे तुम्ही वाचलं आहे. रोज रात्री झोपताना तळपायांना साजूक तुपाने मालिश केली असता सुद्धा डोळे चांगले निरोगी राहतात. आणि तूप लावायला जर काश्याची वाटी वापरली तर अजून जास्त फायदा होतो.

चला तर मग या सोप्प्या गोष्टी करून उन्हाळ्याची मजा लुटा आणि डोळ्यांची काळजीही घ्या.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य