
मित्रांनो, घरात आई किंवा बाबा सकाळी उठून आवरून झालं की काय करतात? चहा ना... काहींना तर दिवसातून ४-५ वेळा चहा लागतो. या चहाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?
जास्त प्रमाणात चहा शरीरात उष्णता वाढवतो आणि त्वचा व केस कोरडे करू शकतो. पोटात आग होते, घश्याकडे आंबट पाणी येतं, डोकं दुखू लागतं.
लहान मुलांनी चहा प्यावा का?
नाही... लहान मुलांनी चहा पिणे टाळावे. कारण -
१. चहामुळे झोप कमी होते
२. पोट नीट साफ होत नाही
३. केस गळायला लागतात
४. सारखी चिडचिड होते
चहासोबत बिस्कीट किंवा चपाती खाताय? थांबा
अनेक मुले चहात बिस्कीट, टोस्ट किंवा चपाती बुडवून खातात. पण हे चुकीचे आहे. आयुर्वेदात याला विरुद्ध आहार म्हणतात.
दुधाचा चहा आणि मीठ असलेले पदार्थ एकत्र करून खाणे शरीरासाठी हानिकारक आहे.
असे रोज खाल्ले असता -
१. त्वचेवर पुरळ येऊ शकते
२. पोटात गॅस होतो
३. पचन बिघडते
४. भविष्यात त्वचाविकार होऊ शकतात
मग सकाळी काय प्यायचं?
चहाऐवजी - हळदीचे दूध , धणे जिऱ्याचे पाणी, सुगंधी गवती चहा, बडिशेप किंवा बाळशेप चा काढा असे पेय आलटून पालटून पिऊ शकता.
आईला सांगा - घरात चहा करताना तो जास्त उकळू नये. एक उकळी आली की गॅस बंद करायचा. शक्यतो कोरा चहा म्हणजेच दूध न घालता चहा घ्यायचा. आणि उन्हाळ्यात चहा टाळायचा. असा युक्तीने मोठ्यांनी चहा घेतल्यास त्याचे खूप दुष्परिणाम दिसणार नाहीत.

- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य