
एका सुंदर, हिरव्यागार जंगलात एक स्वच्छ पाण्याचा तलाव होता. तलावाचे पाणी इतके नितळ होते की त्यातून खालचे रंगीबेरंगी दगड आणि इकडेतिकडे पोहणारे मासे स्पष्ट दिसायचे. याच तलावाच्या काठी राहायचा आपला बग्गू बगळा. बग्गू दिसायला अगदी शुभ्र पांढरा, त्याची मान लांब आणि चोच तर एकदम टोकदार होती. तो रोज सकाळी तलावाच्या काठावर एका पायावर उभा राहून ध्यान लावायचा.
त्याच तलावात त्याचा एक छोटासा मित्रही राहायचा, ज्याचे नाव होते केसू कासव. केसू एकदम चिमुकला होता. त्याच्या पाठीवर एक कडक आणि नक्षीदार कवच होते. केसूला तळ्यातल्या शेवाळात खेळायला आणि कधीकधी काठावर येऊन कोवळ्या उन्हात पाय पसरून झोपायला खूप आवडायचे.
एके दिवशी बग्गू बगळा आकाशात उंच भरारी मारून परत आला. त्याने आपले मोठे पंख फडफडावले आणि तो केसूच्या शेजारी येऊन बसला. केसू बिचारा पाण्यातून डोके वर काढून बग्गूच्या मोठ्या पंखांकडे बघत होता. केसूच्या मनात थोडी हळहळ दाटून आली.
केसू हळूच म्हणाला, "बगळेदादा, बगळेदादा, तुमची किती मजा आहे ना! तुम्ही असे पांढरे शुभ्र पंख पसरवून निळ्याशार आकाशात उंच उंच उडता. ढगांच्या जवळ जाता, तिथून सगळं जग कसं छोटं छोटं दिसत असेल ना? मला मात्र बघा, देवाने हे इतकं जड कवच दिलंय आणि छोटे छोटे पाय दिलेत. मला ना उडता येत, ना वेगात धावता येत. मी फक्त या पाण्यात आणि शेवाळातच अडकून राहतो."
केसूचे डोळे थोडे ओलावले होते. आपल्या मित्राचे बोलणे ऐकून बग्गू बगळ्याने प्रेमाने आपली मान झुकवली आणि तो केसूजवळ गेला. बग्गू म्हणाला, "अरे वेड्या केसू, असं का म्हणतोस? तुला वाटतं तसं काही नाहीये रे."
केसू आश्चर्याने म्हणाला, "म्हणजे? बगळेदादा, तुम्हाला तर सगळं काही मिळतं. तुम्हाला उडता येतं, तुम्ही उंच झाडावर बसू शकता. माझ्याकडे काय आहे?"
बग्गू हसून म्हणाला, "केसू, नीट विचार कर. मला आकाशात उडता येतं हे खरं आहे, पण मला तुझ्यासारखं पाण्याखाली तासनतास श्वास रोखून राहता येतं का? मला तुझ्यासारखं सुंदर पोहता येत नाही. जेव्हा खूप मोठा पाऊस येतो किंवा एखादा शिकारी येतो, तेव्हा तू लगेच तुझ्या टणक कवचाच्या आत मान आणि पाय ओढून घेतोस आणि सुरक्षित होतोस. माझ्याकडे असं स्वतःचं रक्षण करायला कवच नाहीये रे मित्रा."
बग्गू पुढे म्हणाला, "बघ, देवाने प्रत्येकाला काहीतरी खास दिलेलं असतं. मला पंख दिलेत तर तुला सुरक्षित कवच दिलंय. मला आकाशाची सफर दिलीय, तर तुला पाण्याचे खोल आणि शांत जग दिले आहे. आपण दोघेही वेगळे आहोत, म्हणूनच तर आपण एकमेकांचे मित्र आहोत! तू जे करू शकतोस ते मी नाही करू शकत, आणि मी जे करतो ते तुला जमणार नाही. पण यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही, उलट यातच तर खरी गंमत आहे."
केसूला आता बग्गू बगळ्याचे म्हणणे पटले होते. त्याने आपले छोटे पाय हलवले आणि आनंदाने पाण्यात एक गिरकी घेतली. त्याला समजले की, इतरांकडे काय आहे यापेक्षा आपल्याकडे जे आहे, त्यात आनंद मानणे किती महत्त्वाचे आहे.
केसू आनंदाने ओरडला, "बगळेदादा, बगळेदादा, खरंच की! आता मला समजलं. माझ्याकडे माझं हे सुंदर कवच आहे आणि मला छान पोहताही येतं. मी माझ्या या गुणांवर खूप प्रेम करेन."
तेव्हापासून केसू आणि बग्गूची मैत्री अधिकच घट्ट झाली. बग्गू आकाशातल्या गोष्टी सांगायचा आणि केसू त्याला पाण्याच्या खोलवरच्या गंमती सांगायचा. दोघेही आपापल्या जगात अगदी खुश राहू लागले.
तात्पर्य: देवाने प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिलेले असतात. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहून त्याचा आनंद घ्यावा. इतरांशी स्वतःची तुलना करू नये.

स्नेहा सुतार