
अापण अजूनही हवामान बदलाला भविष्यातील समस्या समजत असू, तर ही आपली मोठी चूक आहे. सत्य हे आहे की हवामान बदल आधीच आपल्या दारात उभा आहे आणि आपण त्याकडे अजूनही दुर्लक्ष करत आहोत. उन्हाळ्यातील वाढती उष्णता, अचानक येणारे पूर, अवकाळी पाऊस हे सर्व इशारा आहेत. पण आपण खरंच ते लक्षात घेतो का? नाही!
खरे सांगायचे तर, हवामान बदल ही निसर्गाची चूक नसून ती आपल्या वागण्याचा परिणाम आहे. आपणच हरित पट्टा (green cover) नष्ट केला, आपणच प्लास्टिकचा अतिवापर केला आणि आपणच पर्यावरणाचा समतोल बिघडवला. परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत.
खरे तर हे आहे की, हवामान बदल ही फक्त एखादी तांत्रिक किंवा वैज्ञानिक समस्या नसून ते मानवी अस्तित्वावर आलेले संकट आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण बदलायला हवे आणि बदल स्वीकारायला हवा. विकासाच्या नावाखाली आपण पृथ्वीचा गळा घोटत आहोत.
हा विषय अधिक गंभीर आहे. झाडे आपल्याला प्राणवायू (oxygen) तयार करून देतात, पण आपण त्यांनाच तोडून टाकत आहोत. शहरांचा विकास आणि उद्योगांच्या वाढीसाठी आपण निसर्गाचा नाश करत आहोत. परिणाम काय? तर वाढते तापमान, कमी होत जाणारे पाणी आणि नष्ट होणारी जीवसृष्टी.
जर आपण बदललो नाही, तर येणाऱ्या पिढीला आपण एक सुरक्षित आणि राहण्यायोग्य पृथ्वी देऊ शकणार नाही. याची आजही आपण काहीच दखल घेत नाही. आता प्रश्न असा आहे की, आपल्याला अजून किती पुरावे हवेत? शेवटी एकच प्रश्न उरतो -
"तुम्ही अजूनही शांत बसणार आहात का कृती करणार आहात?”

नाव : स्वरा रुपेश गवस इयत्ता : सहावी
शाळा : डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, कुजिरा