
गुढीपाडवा साजरा करून नवीन वर्षाची छान सुरुवात तुम्ही केली असेल. नवीन वर्ष सुरू झालं की आपण कितीतरी नव नवीन गोष्टी करणार असं ठरवतो आणि त्यातल्या काही गोष्टी पूर्ण सुद्धा करतो. तुम्ही या नवीन वर्षात जे जे ठरवलं आहे ते तुमच्या कडून पूर्ण होवो अशी प्रार्थना. आपली रोजची दिनचर्या ठरलेली असते, त्यात काही आवश्यक व योग्य बदल केल्यास आपलं आयुष्य अजून सुंदर आणि निरोगी होऊ शकतं. आपल्या रूटीन मधली एक महत्वाची क्रिया म्हणजे जेवण जेवणे. आपण रोज जेवतो, पण जेवणापूर्वी आणि नंतर काय करावे हे आपल्याला माहीत आहे का? जेवणाच्या वेळी पाळायच्या सवयींना खूप महत्त्व आहे. योग्य सवयी ठेवल्या तर शरीर निरोगी राहते.
जेवणापूर्वी काय करावे?
हात व पाय स्वच्छ धुवा
जेवणापूर्वी साबणाने हात धुणे अत्यंत गरजेचे आहे. नखांमध्ये असलेली घाण नीट स्वच्छ करावी. हातावरील जंतू पोटात गेले तर आजार होऊ शकतात. बाहेरून येऊन जेवणार असाल तर पाय सुद्धा धुवावे.
शांत बसा
जेवणापूर्वी एक मिनिट शांत बसा. धावपळ करत, टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत जेवू नका. शांत मनाने जेवल्यास पचन चांगले होते. ताटात कोणकोणते पदार्थ आहेत, त्यांची चव कशी आहे हे नीट लक्षात येतं. लक्ष देऊन , व्यवस्थित अन्नाचे घास चावून चावून जेवले असता पचन चांगले होते.
आले + सैंधव मीठ घ्या
जर तुम्हाला भूक लागत नसेल तर जेवणापूर्वी आल्याचा पातळ तुकडा घ्या त्याला किंचित सैंधव मीठ लावा आणि चावून चावून खा. असे केल्याने जिभेची रुची वाढून कडकडून भूक लागेल.
कृतज्ञता व्यक्त करा म्हणजेच धन्यवाद म्हणा
अन्नाबद्दल कृतज्ञ रहा म्हणजेच तुम्हाला छान छान पदार्थ खायला मिळाले म्हणून देवाचे, शेतकऱ्याचे व जेवण ज्यांनी केलं आहे त्यांना थेंक्यू म्हणा. असे बरेच लोक आहेत ज्यांना जेवण सुद्धा मिळत नाही, किंवा शिळे अन्न खावे लागते. आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या ताज्या आहाराचे महत्व आपल्या नेहमी लक्षात रहावे म्हणून धन्यवाद मानावे.
जेवणानंतर काय करावे?*
थोडावेळ शांत बसावे
जेवणानंतर लगेच चालणे, धावणे, खेळणे टाळावे. १५-२० मिनिटे शांत बसावे. त्यानंतर थोडेसे घरातल्या घरात फिरावे. म्हणजेच शतपावली करावी.
लगेच झोपू नये
जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडा वेळ डावीकडे कूस करून बसल्याने पचन सुधारते. यालाच वामकुक्षी म्हणतात. वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर सोफ्यावर ताणून देणे नाही हा. लगेच ताणून दिले तर आहार पचणार नाही आणि आजार होतील.
जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका
जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमी होते. म्हणून जेवताना मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे. जेवणानंतर किमान ३० मिनिटे थांबून पाणी प्यावे.
मुख शुद्धी करणारे पदार्थ खावे
जेवणानंतर पचनाला मदत करणारे पदार्थ खावे. जसे की जिरे, बडिशेप, ओवा इ. जेवणानंतर कधीही गोड पदार्थ, चॉकलेट किंवा आईस्क्रीम खाऊ नये. मुखवास तुम्ही घरच्या घरी स्वतः तयार करू शकता. त्यासाठी जिरे - ४ चमचे, बडिशेप - ४ चमचे, धणेपूड -१ चमचा, काळे किंवा पांढरे तीळ - १ चमचा, ओवा - १/२ चमचा, सैंधव मीठ १/८ चमचा हे सगळे जिन्नस न भाजता एकत्र करावे आणि डब्यात भरून ठेवावे. जेवणानंतर १ छोटा चमचा तयार मुखवास चावून खावा. याने पचन चांगले होते.
जेवणानंतर लगेच आंघोळ करू नका
आंघोळ नेहमी जेवायच्या आधी करावी. जेवणानंतर आंघोळ केली असता तुम्ही खाल्लेले पदार्थ नीट पचणार नाहीत. आणि पचन व्यवस्थित झाले नाही तर पोषण होणार नाही आणि शरीराची ताकद वाढणार नाही. त्याशिवाय अजीर्ण झाल्यामुळे आजार होण्याची शक्यता सुद्धा वाढेल.
या गोष्टी जरी साध्या वाटल्या तरी आरोग्यावर चांगला परिणाम करणाऱ्या आहेत. तुम्ही नक्कीच या गोष्टींचं अनुसरण करणार याची मला खात्री आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य